...

“दीड तासात राजकीय पुनर्जन्म!” अजित पवारांचा फोन आणि चंद्रकांत पाटलांवर बालवडकरांचा स्फोटक हल्ला

 

पुणे. “दीड तासात राजकीय पुनर्जन्म !” हा केवळ शब्दांचा खेळ नाही, तर पुण्यातील सध्याच्या राजकारणाचे वास्तव आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल बालवडकर यांनी बाणेर येथील जाहीर सभेत राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर थेट आरोप करत आपला राजकीय संघर्ष उघड केला. उमेदवारी कापण्यासाठी दीड वर्षांचे कटकारस्थान आणि त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा निर्णायक फोनमुळे दीड तासात राजकीय पुनर्जन्म झालं असे अमोल बालवडकर यांना सांगितले आहे. (amol balwadkar vs chandrakant patil pune politics ajit pawar)

 

 

वाहतूक, प्रदूषण, पाणीटंचाईवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल ; पुण्यात विजयी संकल्प सभा

 

बालवडकर म्हणाले की, “मला उमेदवारी मिळू नये यासाठी चंद्रकांत पाटील यांनी तब्बल दीड वर्षे कटकारस्थान रचले. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवघ्या दीड तासात तो कट उधळून लावला. अजित पवार यांच्यामुळेच माझा राजकीय पुनर्जन्म झाला आहे.” उमेदवारीच्या दिवशी एबी फॉर्मसाठी सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत झुलवत ठेवण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी स्थानिक नेतृत्वावरही नाराजी व्यक्त केली. “तरुणपणातील अकरा वर्षे मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केले. मात्र ऐनवेळी मला डावलण्यात आले,” असे ते म्हणाले.

 

 

‘गुन्हेगाराची पत्नी असली तर दोष काय?’ अजित पवारांचा थेट सवाल, टीकेला जोरदार प्रत्युत्तर

 

 

कोथरूड विधानसभा निवडणुकीत माघार घेतली नसती, तर आपण अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली असती, असे थेट आव्हानही त्यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले. भावनिक होत बालवडकर म्हणाले, “माझ्या आई-वडिलांसमोर चंद्रकांत पाटील यांनी मला मोठं करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्याच नेत्याने माझी उमेदवारी कापली. ज्यांना आपण घरात पाहुणचार दिला, त्याच लोकांनी विश्वासघात केला.”

 

 

या संपूर्ण प्रकारामुळे आपण तीव्र मानसिक तणावात गेलो होतो आणि काही क्षण डोळ्यांसमोर अंधार आल्याचेही त्यांनी सांगितले. “त्याच वेळी अजित पवार यांचा फोन आला आणि अवघ्या दीड तासात माझा राजकीय पुनर्जन्म झाला,” असे त्यांनी सांगितले. “ही लढत कार्यकर्ता विरुद्ध नेता अशी आहे. पुढील चार वर्षांत माझ्या आई-वडिलांच्या अश्रूंचा बदला घेणार,” असे म्हणत अमोल बालवडकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना थेट लक्ष्य केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत बालवडकरांनी जोरदार फटकेबाजी करत आपली भूमिका स्पष्ट केली.

 

 

 

Local ad 1