पुणे, दि. 12 : पुणे जिल्ह्याच्या विकासामध्ये अजित पवार यांचे योगदान विसरता येणार नाही. अनेक विकास प्रकल्पांना गती देत त्यांनी जिल्ह्याच्या प्रगतीला नवी दिशा दिली. संकटाच्या काळात अनेकांना मदतीचा हात देणारे, कार्यकर्त्यांशी आपुलकीने वागणारे आणि कामात कठोर शिस्त पाळणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व असल्याच्या भावना पुणे जिल्हा परिषदेच्या आजी-माजी सदस्यांनी व्यक्त केल्या. त्यांच्या आठवणीने अनेकांना गहिवरून आले.
Pune water tanker demand। उन्हाळ्याआधीच पुण्यात पाणीटंचाई ; टँकरची मागणी झपाट्याने वाढली
पुणे जिल्हा परिषदेतील आजी-माजी सदस्यांच्या वतीने ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन तसेच अजित पवार यांच्या स्मरणार्थ भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत उपस्थित मान्यवरांनी अजित पवार यांच्या कार्याचा, संघर्षमय प्रवासाचा आणि पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
अजित पवार यांनी जिल्हा परिषदेच्या नव्या इमारतीच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण, शेती आणि सिंचन प्रकल्पांना गती देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला. विकासकामांबाबत त्यांची निर्णयक्षमता, कामातील वेग आणि अचूक नियोजन ही त्यांची वैशिष्ट्ये होती.
पुणे जिल्हा परिषद, जिल्हा सहकारी बँक तसेच विविध सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. अनेक विकास प्रकल्पांना गती देत त्यांनी जिल्ह्याच्या प्रगतीला नवी दिशा दिली. अनेक वर्षांच्या अथक परिश्रम आणि जनतेशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळे ते महाराष्ट्रातील प्रभावी नेते म्हणून उदयास आले, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. त्यांच्या स्मृती चिरंतर ठेवण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष योजना राबविणे तसेच स्मारक उभारण्याबाबत सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते, नाना देवकाते, वैशाली आबने, प्रदीप कंद, देवराम लांडे, पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, सुखदेव बनकर, नृसिंह मित्रगोत्री, अरुण गिरे, श्रीमंत ढोले, सुवर्णा दरेकर, रमेश कोंडे, मंगलदास बांदल, वीरधवल जगदाळे, सुजाता पवार, सविता बगाटे, पत्रकार शाम दौंडकर, संभाजी होळकर, किरण तावरे आदी उपस्थित होते. शरद बुट्टे पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली तर आशिष हंसराज यांनी सूत्रसंचालन केले. सभेच्या शेवटी सर्व उपस्थितांनी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


