...

पुण्यात गॅस तुटवडा? युवक काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; उद्योग आणि लग्नसमारंभांवरही परिणाम

पुणे : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा परिणाम आता पुणेकरांच्या दैनंदिन जीवनावर जाणवू लागला आहे. शहरात घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या तुटवड्याच्या तक्रारी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे मीडिया विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली. यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव आनंद दुबे, मेघश्याम धर्मावत, नेहल देशमुख, अथर्व सोनार, शिवानी देशमुख आणि भूषण भंडारी उपस्थित होते.

निवेदनात नमूद केल्यानुसार, शहरातील अनेक भागांमध्ये घरगुती गॅस वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांना स्वयंपाकासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. या तुटवड्याचा परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, विद्यार्थी वसतिगृह, केटरिंग व्यवसाय तसेच लग्न समारंभ आणि विविध कार्यक्रमांवरही होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने गॅस उपलब्धतेच्या अनिश्चिततेमुळे काही कुटुंबांनी लग्न समारंभ पुढे ढकलण्याचा विचार सुरू केल्याची माहितीही निवेदनात देण्यात आली आहे.

तसेच पुणे परिसरातील पावडर कोटिंग युनिट्स, लघुउद्योग, उत्पादन प्रकल्प आणि विविध औद्योगिक युनिट्स मोठ्या प्रमाणावर गॅसवर अवलंबून असल्यामुळे पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यास उद्योग क्षेत्रावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. परिणामी काही कामगार पुन्हा त्यांच्या मूळ राज्यात परत जात असल्याचेही निदर्शनास आले आहे.

 

दरम्यान, गॅस तुटवड्याच्या परिस्थितीचा फायदा घेत काही ठिकाणी एलपीजी सिलिंडरचा काळाबाजार सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत असल्याचा गंभीर मुद्दाही युवक काँग्रेसने मांडला आहे.

 

 

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने एलपीजी गॅस संदर्भातील तक्रारींसाठी विशेष हेल्पलाईन क्रमांक जाहीर करावा, गॅस एजन्सींवर विशेष तपासणी मोहीम राबवून साठेबाजी व काळाबाजारावर कठोर कारवाई करावी आणि नागरिक व उद्योगांसाठी गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

यावेळी अक्षय जैन म्हणाले, “गॅस तुटवड्याचा परिणाम सामान्य नागरिक, उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रावर होत आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पुरवठा सुरळीत करणे आणि काळाबाजार रोखणे अत्यंत आवश्यक आहे.”

 

Local ad 1