Pune water tanker demand। उन्हाळ्याआधीच पुण्यात पाणीटंचाई ; टँकरची मागणी झपाट्याने वाढली
pune water tanker demand february 46068 pmc water shortage
Pune water tanker demand। पुणे : उन्हाळा सुरू होताच शहरात पाण्याची टंचाई जाणवू लागली असून टँकरच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा फेब्रुवारी महिन्यातच टँकरची मागणी सुमारे साडेसहा हजारांनी वाढली आहे. फेब्रुवारी महिन्यात तब्बल ४६ हजार ०६८ टँकरच्या फेऱ्या झाल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली. गेल्या वर्षी म्हणजे फेब्रुवारी २०२५ मध्ये ३९ हजार ४८८ टँकर सुरू होते. त्याआधी २०२३-२४ मध्ये फेब्रुवारी महिन्यात ३३ हजार ९५१ टँकर वापरले गेले होते. त्यामुळे दरवर्षी टँकरवरील अवलंबित्व वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. महापालिकेच्या माहितीनुसार डिसेंबरपासूनच शहरातील काही भागांत टँकरची मागणी वाढण्यास सुरुवात झाली होती. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात त्यात अधिक वाढ झाली असून मार्चच्या अखेरीस ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पुण्यात गॅस तुटवडा? युवक काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; उद्योग आणि लग्नसमारंभांवरही परिणाम
शहराच्या उपनगरांमध्ये उभारलेल्या नव्या वसाहतींमध्ये महापालिकेचे जलवाहिनी जाळे पूर्णपणे विकसित झालेले नसल्याने तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. धनकवडी, कात्रज, कोंढवा, येवलेवाडी, किरकिटवाडी, वडगाव बुद्रुक, धायरी, वाघोली, धानोरी, लोहगाव, सूस आणि पाषाण या भागांत टँकरची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. ज्या भागात महापालिकेला नियमित पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही किंवा कमी दाबाने पाणी मिळते, अशा भागांना मोफत टँकरद्वारे पाणीपुरवठा
केला जातो. तसेच नागरिकांच्या मागणीनुसार महापालिका ठराविक शुल्क घेऊन टँकर उपलब्ध करून देते. खासगी टँकर चालकांनाही महापालिका कमी दरात पाणी भरून देते.
टँकर भरण्यासाठी महापालिकेने पर्वती, वडगाव शेरी, धायरी, रामटेकडी, चतुश्रृंगी, पद्मावती आणि पटवर्धन बागयेथे सात टँकर पॉइंट सुरू केले आहेत. याच ठिकाणांहून महापालिकेचे तसेच ठेकेदारांचे टँकर शहरात पाणीपुरवठा करतात.
यावर्षी जानेवारी महिन्यात ४२ हजार ५४२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. फेब्रुवारीमध्ये ही संख्या वाढून ४६ हजार ६८ वर पोहोचली आहे.
गेल्या काही वर्षांतील फेब्रुवारी महिन्यातील टँकरची आकडेवारी
* फेब्रुवारी २०२३-२४ : ३३,९५१
* फेब्रुवारी २०२४-२५ : ३९,४८८
* फेब्रुवारी २०२५-२६ : ४६,०६८
“फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे काही भागांत टँकरच्या पाण्याची मागणी वाढत आहे. नागरिकांना अडचण येऊ नये यासाठी आवश्यकतेनुसार टँकरची संख्या वाढवली जात आहे.”
— नंदकिशोर जगताप, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग

