१३४ वर्षांच्या एम्प्रेस गार्डनवर बांधकामाचा घाव? अडीच एकर जागा हस्तांतरणाला विरोध

एम्प्रेस वाचवा’साठी पुणेकरांनी आवाज उठवावा; हॉर्टिकल्चरल सोसायटीचा शासनावर तीव्र प्रहार

 

Empress Garden Land Transfer Pune पुणे : पुणे शहराच्या वैभवशाली इतिहासाची आणि समृद्ध जैवविविधतेची साक्ष देणाऱ्या एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनवरच घाला घालण्याचा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप ‘दि अँग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया’च संस्थेचे अध्यक्ष प्रताप पवार आणि मानद सचिव सुरेश पिंगळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

 

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अतिक्रमणे नियमित होणार? २०११ पूर्वीच्या निवासी अतिक्रमणांसाठी विशेष धोरण

 

न्यायालयाच्या बांधकामासाठी बागेची सुमारे अडीच एकर जागा हस्तांतरित करण्याच्या शासनाच्या प्रक्रियेला संस्थेने तीव्र विरोध केला असून, “विकासाच्या नावाखाली पुण्याच्या हिरव्या फुफ्फुसांवर सिमेंटचा घाव का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.

 

१८९२ पासून तब्बल १३४ वर्षे एम्प्रेस गार्डनचे जतन आणि संवर्धन करणाऱ्या संस्थेने शासनाच्या भूमिकेवर जोरदार आक्षेप घेतला आहे. शेकडो दुर्मीळ वृक्ष, विविध वनस्पती आणि जैवविविधतेचा अमूल्य ठेवा असलेल्या या परिसरावर बांधकामाचा बोजा टाकल्यास त्याचा पर्यावरणावर गंभीर परिणाम होईल, असा इशारा संस्थेने दिला आहे.

 

‘झाडे तोडून विकास नको!’

एम्प्रेस गार्डनच्या संबंधित जागेवर भविष्यात जैवविविधता उद्यान विकसित करण्याची योजना असून, त्यासाठी संस्थेने वृक्षांचे जतन व संवर्धन केले आहे. अशा परिस्थितीत हीच जागा बांधकामासाठी घेण्याचा निर्णय म्हणजे पुण्याच्या पर्यावरणीय भवितव्याशी खेळ असल्याची भूमिका संस्थेने मांडली आहे. पुणे शहर आधीच वाढते प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि घटते हरित क्षेत्र यामुळे त्रस्त आहे. अशा वेळी शहरातील महत्त्वाच्या हिरव्या पट्ट्याचे क्षेत्र कमी करणे म्हणजे पुणेकरांच्या श्वासावरच घाला घालण्यासारखे आहे, असे संस्थेने म्हटले आहे.

 

१३४ वर्षे जपले, आता जमीन हिसकावणार?
विशेष म्हणजे, १८९२ पासून या बागेच्या संवर्धनासाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळाली नसतानाही संस्थेने लोकसहभाग आणि स्वबळावर हा ऐतिहासिक वारसा जपला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ज्यांनी दशकानुदशके हा वारसा जपला, त्यांच्याच हातून तो हिरावून घेण्याचा प्रयत्न का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.जागा हस्तांतरणाच्या प्रक्रियेविरोधात संस्थेने आंदोलने, निवेदने आणि विविध माध्यमातून विरोध नोंदविला आहे. मात्र, लोकभावना आणि पर्यावरणीय प्रश्नांकडे दुर्लक्ष करून शासनाकडून प्रक्रिया पुढे नेली जात असल्याचा आरोप संस्थेने केला आहे.

 

‘एम्प्रेस वाचवा’ची हाक
एम्प्रेस गार्डन ही केवळ बाग नाही; ती पुण्याच्या इतिहासाची, निसर्गाची आणि पुढील पिढ्यांच्या श्वासाची ठेव आहे. त्यामुळे प्रस्तावित जागा हस्तांतरणाचा निर्णय तातडीने थांबवून एम्प्रेस गार्डनचे संरक्षण करावे, अशी मागणी संस्थेने केली आहे.पुणेकरांनीही या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून एम्प्रेस गार्डनच्या संरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आवाज बुलंद करावा, असे आवाहन अध्यक्ष प्रताप पवार आणि मानद सचिव सुरेश पिंगळे यांनी केले आहे.

 

 

 

Local ad 1