Mauritius Tourism : मॉरिशसला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांत वाढ
जानेवारी ते जुलैदरम्यान सुमारे ५१ हजार भारतीय पर्यटकांचा मॉरिशस दौरा; पुण्यात पर्यटन क्षेत्रातील भागीदारांचा ट्रेड संवाद
Mauritius Tourism पुणे : मॉरिशसला जाणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या संख्येत यंदा चांगली वाढ झाली आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत सुमारे ५१ हजार भारतीय पर्यटकांनी मॉरिशसला भेट दिली असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत पर्यटकसंख्येत १४.५ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
भारत आणि मॉरिशसदरम्यान पर्यटन व सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी मॉरिशस टूरिझम प्रमोशन अथॉरिटी (MTPA) तर्फे पुण्यात पर्यटन क्षेत्रातील भागीदारांसाठी ट्रेड संवादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मॉरिशसमधील हॉटेल व्यावसायिक, ट्रॅव्हल एजंट, विमान कंपन्यांचे प्रतिनिधी आणि अन्य पर्यटन भागीदारांसह २० हून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले.
MTPAचे भारतातील संचालक बेनॉइट हार्टर यांनी सांगितले की, भारतातून परदेशातील पर्यटनाची मागणी वाढत आहे. त्यानुसार पुण्यासह हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता येथेही मॉरिशसच्या पर्यटनाचे प्रचार अभियान राबविण्यात येत आहे.
भारतीय पर्यटकांसाठी मॉरिशसची ओळख केवळ समुद्रकिनारे आणि हनिमून डेस्टिनेशन अशी न ठेवता अॅडव्हेंचर, निसर्ग पर्यटन, वेलनेस, गोल्फ, MICE आणि कौटुंबिक पर्यटनाला प्रोत्साहन दिले जात आहे. Gen Z, गोल्फप्रेमी तसेच उच्च उत्पन्न गटातील पर्यटकांना आकर्षित करण्यावर विशेष भर दिला जात आहे. ग्रँड बेसिन, आप्रवासी घाट, चामारेल, ब्लॅक रिव्हर गॉर्जेस आणि कासेला यांसारख्या पर्यटनस्थळांचाही भारतीय बाजारपेठेत प्रचार केला जात आहे. पर्यटकांची संख्या वाढविण्याबरोबरच प्रीमियम आणि अधिक खर्च करणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यावर भर असल्याचे हार्टर यांनी सांगितले. लक्झरी पर्यटन, MICE आणि बहुपिढी कुटुंबांच्या पर्यटनालाही प्राधान्य दिले जात आहे.
थेट विमान सेवेमुळे प्रवास सुलभ
भारतीय पर्यटकांसाठी मॉरिशसमध्ये व्हिसा-फ्री प्रवेशाची सुविधा उपलब्ध आहे. एअर मॉरिशस, इंडिगो आणि एअर इंडियाच्या थेट विमानसेवेमुळे मॉरिशसला जाणे अधिक सुलभ झाले आहे. हिंदी आणि भोजपुरी भाषेचा वापर, भारतीय खाद्यपदार्थ, मंदिरे आणि भारतीय सण-उत्सवांची उपस्थिती यामुळे भारतीय पर्यटकांना मॉरिशसमध्ये सांस्कृतिक जवळीकही जाणवते.

