पुणेकरांसाठी पर्वणी: गोखलेनगर मध्ये इस्रोच्या मोहिमांवर आधारित वैज्ञानिक देखावा ; ‘अंतराळवीर व्हायचंय मला’ ठरतोय आकर्षित

पुणे, ता. २० : गणेशोत्सवानिमित्त गोखले नगर येथील सुयोग मित्र मंडळाच्या वतीने यंदा ‘भारतीय अवकाश मोहीम – अंतराळवीर व्हायचंय मला’ हा वैज्ञानिक देखावा साकारण्यात आला आहे. इस्रोच्या विविध अंतराळ मोहिमांची माहिती देणारा हा देखावा विद्यार्थ्यांसह नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.

देशातील खासगी क्षेत्रातील पहिले रॉकेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘विक्रम-१’च्या प्रतिकृतीसह इस्रोच्या अंतराळ मोहिमांचा प्रवास या देखाव्यात मांडण्यात आला आहे. चांद्रयान-१, चांद्रयान-२, चांद्रयान-३, मंगळयान आणि आदित्य-एल१ या मोहिमांची माहिती देण्यात आली आहे. तसेच गगनयान, शुक्रयान, नियोजित चांद्रमोहीम आणि भारतीय अंतराळ स्थानकाच्या संकल्पनेची माहितीही या माध्यमातून देण्यात आली आहे.

मोहिमांची माहिती देणारे डिजिटल फलक, सोप्या भाषेतील निवेदन, चांद्रयानच्या उड्डाणाचे हलते दृश्य आणि अंतराळवीराच्या वेशातील छायाचित्रणासाठी उभारण्यात आलेला ‘सेल्फी पॉईंट’ ही देखाव्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. अवकाश तंत्रज्ञान आणि या क्षेत्रातील संधींबाबत विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण व्हावे, हा देखावा उभारण्यामागील उद्देश असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

मंडळाचे अध्यक्ष मुकेश खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा साकारण्यात आला. आशिष माने, शुभम वाईकर, मंगेश तडके, विश्वजीत भवारी, साईराज बढे, नील दगडे, संतोष चौधरी, साईराज शिर्सेकर, सार्थक धुमाळ, सार्थक नेटके, ऍरोन त्रिभुवन, सुयोग देखणे आणि ओमकार मापुसकर यांनी सजावटीसाठी योगदान दिले.

 

 

Local ad 1