पुणे : राज्यातील वाढत्या कर्करोग रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात व्यापक स्वरूपात ‘कर्करोग ग्रीड’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली. कर्करोगाचे वेळेत निदान आणि योग्य उपचार झाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे राज्यातील आरोग्य सेवा अधिक समन्वयित आणि प्रभावी करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यात हिट अँड रन ; मद्यधुंद कारचालकाच्या धडकेत ४ वर्षीय मुलाचा मृत्यू
पुणे महापालिका आणि आपुलकी हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (PPP) बाणेर येथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कर्करोग रुग्णालयाच्या लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, सभागृहनेते गणेश बीडकर, विरोधी पक्षनेते निलेश निकम, आयुक्त नवलकिशोर राम आणि भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, “कर्करोगाच्या उपचारात विलंब झाल्यास रुग्णांना दीर्घकालीन उपचारांसह मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांमध्ये कर्करोग उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. नागरिकांना वेळेत उपचार मिळणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे.”
राज्यभरातील आरोग्य सेवा एकत्रित आणि समन्वयित स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी ‘कर्करोग ग्रीड’ ही संकल्पना महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या माध्यमातून रुग्णांना योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले म्हणाले, भारतातील पहिले PPP मॉडेलवरील शासकीय दरात उपचार देणारे हे कर्करोग रुग्णालय आहे. पुणे महापालिकेने कोट्यवधी रुपयांची जमीन उपलब्ध करून दिली असून आपुलकी हेल्थकेअरने प्रकल्प उभारणीसाठी पुढाकार घेतला.
150 खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय
बाणेर येथील या 150 खाटांच्या कर्करोग रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सर्व उपचार CGHS (शासकीय दर) नुसार दिले जाणार असून केंद्र व राज्य शासनाच्या प्रमुख आरोग्य योजनांचा लाभही रुग्णांना मिळणार आहे.
रुग्णालयातील प्रमुख सुविधा
* लिनियर अॅक्सिलरेटर – ट्रूबीम, हायपरआर्क
* डिजिटल PET स्कॅनर
* जीनोम सिक्वेन्सिंग सुविधा
* संपूर्ण पॅथॉलॉजी आणि हिस्टोपॅथॉलॉजी सेवा
* 3 टेस्ला MRI
* 160-स्लाइस CT स्कॅनर
* 3 मॉड्युलर ऑपरेशन थिएटर
* 20 बेडेड ICU/CCU
* 8 बेडेड न्यूक्लियर मेडिसीन विभाग
* 23 बेडेड किमोथेरपी वॉर्ड
* खासगी, अर्ध-खासगी आणि जनरल वॉर्ड सुविधा
* सर्व शासकीय वैद्यकीय योजना व अनुदान सुविधा
* खासगी विमा कंपन्यांच्या सेवा उपलब्ध

