AI in Journalism। AI न शिकणारे पत्रकार मागे पडतील ; बातमीदारी मात्र कायम राहणार : मिलिंद खांडेकर

AI in Journalism । पुणे : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) पत्रकारितेसाठी मोठा बदल घेऊन आली असली, तरी बातमीदारीसारखे श्रमप्रधान काम भविष्यातही टिकून राहणार आहे. मात्र, AI चा वापर शिकला नाही तर पत्रकार मागे पडण्याचा धोका आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार आणि इंडिया टुडे समूहाच्या तक चॅनल्सचे व्यवस्थापकीय संपादक मिलिंद खांडेकर यांनी व्यक्त केले. 

 

 

फ्रेंड्स ऑफ व्यंकटेश आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘AI क्रांती – पत्रकारिता बहरेल की ओसरेल?’ या विषयावरील व्यंकटेश चपळगावकर स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, प्रतिभा चंद्रन, प्राची कुलकर्णी आणि मयूरेश कोण्णूर उपस्थित होते.

 

खांडेकर म्हणाले, पत्रकारितेने आतापर्यंत अनेक तांत्रिक बदल अनुभवले आहेत. पूर्वी वृत्तवाहिन्यांमध्ये एका बातमीदारासोबत पाच-सहा जणांची टीम असायची. आज मोबाईलवरून थेट बातमीदारी होत आहे. कम्पोझिटरसारख्या अनेक भूमिका कालांतराने कमी झाल्या. तरीही पत्रकार टिकून राहिला. मात्र, आता AI च्या युगात बदल स्वीकारणे गरजेचे आहे.

 

AI च्या परिणामांबाबत बोलताना त्यांनी पुण्यातील एका मोठ्या कंपनीचे उदाहरण दिले. कर्जपुरवठ्यासारखी प्रक्रिया AI द्वारे केली जात असल्याचे सांगत त्यांनी आयटी क्षेत्रातही कर्मचारी कपात वाढल्याकडे लक्ष वेधले. “गुगल (google) ही मोठी लायब्ररी आहे, तर AI हा प्राध्यापकासारखा आहे. माहिती मिळवण्याची आणि तिचा उपयोग करण्याची पद्धत AI मुळे बदलली आहे. क्रिएटिव्ह कामेही आता AI द्वारे शक्य झाली आहेत,” असे ते म्हणाले.

 

पत्रकारितेतील मानवी घटक अधोरेखित करताना खांडेकर यांनी सांगितले की, AI प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन बातमी आणू शकत नाही. “बातमीदारी हे श्रमाचे काम आहे. त्यामुळे AI च्या काळातही बातमीदार टिकेल. पण AI वापरता आला नाही, तर मागे पडण्याची भीती आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. AI वापरताना माहितीची पडताळणी करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. AI चा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नसली, तरी योग्य तथ्य तपासणीमुळे धोके कमी करता येतात, असे त्यांनी नमूद केले.

 

“हे तंत्रज्ञान आता कायम राहणार आहे. पुढे त्यात आणखी बदल होतील. त्यामुळे पत्रकार आणि माध्यम संस्थांनी बदल स्वीकारत नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे आवश्यक आहे,” असेही खांडेकर यांनी स्पष्ट केले.

 

 

Local ad 1