पुणे : महापालिकेत समाविष्ट होऊनही महंमदवाडी परिसरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. नियमित पाणीपुरवठा नसल्याने नागरिकांना दररोज लाखो रुपये खर्च करून खासगी टँकर आणि विकतच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते. मात्र आता या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत महंमदवाडी परिसरातील दोराबजी मॉलजवळ उभारण्यात आलेला भव्य पाणी साठवणूक प्रकल्प आणि वितरण वाहिनीचे काम पूर्ण झाले असून या प्रकल्पातून पाणीपुरवठा ही सुरू झाला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण रविवारी (१७ मे) दुपारी १ वाजता होणार असल्याची माहिती प्रभाग क्रमांक ४१ चे नगरसेवक निवृत्ती (आण्णा) ज्ञानोबा बांदल यांनी दिली.
या पाणीपुरवठा प्रकल्पाचा लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महंमदवाडी आणि परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम नसल्याने नागरिकांना वारंवार टंचाईला सामोरे जावे लागत होते. नव्याने उभारण्यात आलेल्या या जलसाठा प्रकल्पामुळे परिसरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम, नियमित आणि शाश्वत होण्यास मदत होणार आहे.
उद्घाटन सोहळा रविवारी, १७ मे रोजी दुपारी १ वाजता रहेजा चौक, महंमदवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नगरसेवक निवृत्ती बांदल यांनी केले आहे. या प्रकल्पामुळे महंमदवाडी-उंड्री परिसरातील हजारो नागरिकांच्या पाणी समस्येला मोठा दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

