पुणे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांच्या निधनाने पत्रकारितेतील लढवय्या, संघटक आणि अनेकांसाठी आधारवड ठरलेले नेतृत्व हरपल्याची भावना विविध क्षेत्रांतील ज्येष्ठांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थितांनी कै. भोईटे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. (prakash bhoite senior journalist pune death news)
पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार कै. प्रकाश भोईटे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पत्रकार भवन येथे शनिवारी सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील, सरचिटणीस मंगेश फल्ले, खजिनदार दिलीप तायडे, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष शैलेश काळे, कार्यवाह पांडुरंग सांडभोर, ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे, कल्पना खरे, राजेंद्र पाटील, मंगेश कोळपकर, जयराम देसाई, मारुती जोशी, मोरेश्वर जोशी, नंदकुमार काकीर्डे, दिगंबर दराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, प्रदीप पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी,विद्याधर अनस्कर ,भाजपचे ज्येष्ठ नेते योगेश गोगावले, माजी पोलिस सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे, मराठा सेवा संघाचे राजेंद्र कुंजीर, प्रविण गायकवाड, बाळासाहेब दाबेकर,संगीता तिवारी, जिल्हा परिषदेचे आशिष जरग, प्रताप भोईटे, संदीप जगताप यांच्यासह विविध वृत्तपत्रातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय, राजकीय यांसह विविध क्षेत्रातील ज्येष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकारांच्या हक्कासाठी कायम लढणारा लढवय्या, निर्भीड आणि स्पष्टवक्ता हरपल्याने पत्रकारितेची मोठी हानी झाली असल्याची भावना शैलेश काळे यांनी व्यक्त केली.
पत्रकार संघाच्या उभारणीपासून ते इमारत, सभागृह, रस्ता अशा पायाभूत सुविधांसाठी प्रकाश भोईटे यांचे भरीव योगदान आहे. पत्रकारांवरील हल्ल्यांविरोधात त्यांनी दिलेला लढा, संघटित शक्तीवर ठेवलेला विश्वास आणि पत्रकार कुटुंबासाठी घेतलेली जबाबदारी हे त्यांचे कार्य मोठे आहे. त्यांनी पत्रकार संघटना बळकट करण्यासाठी आयुष्य झोकून दिले होते, अशा शब्दांत राजीव साबडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ग्रामीण भागातील निर्भीड आणि स्पष्टवक्ते पत्रकार यांनी काम केले, अशी भावना अंकुश काकडे व्यक्त केली. त्यांनी जिल्हा परिषदेच्या चांगल्या कारभाराबरोबरच भ्रष्ट कारभारदेखील पुढे आणला, असे त्यांनी नमूद केले.
अभय कुलकर्णी यांनी भोईटे हे सक्रिय, समाजाशी जोडलेले आणि सर्वांचे मित्र होते, असे सांगितले. मोहन जोशी यांनी त्यांच्या परखड पत्रकारितेचा उल्लेख करत ग्रामीण प्रश्नांवर त्यांनी नेहमीच ठाम भूमिका मांडल्याचे सांगितले. राजेंद्र पाटील यांनी त्यांना संवेदनशील पत्रकार व शेतकरी प्रश्नांचा आवाज म्हणून गौरविले. मंगेश कोळपकर यांनी भोईटे हे अनेकांसाठी मार्गदर्शक व आधारस्तंभ होते, असे सांगितले. योगेश गोगावले यांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील वजनदार व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करत, एक उमदा मित्र गमावल्याची भावना व्यक्त केली. प्रदीप देशमुख यांनी त्यांना मित्र, भाऊ आणि मार्गदर्शक म्हणून ते कायम पुढे होते. लढवय्या पत्रकार आणि पुस्तकप्रेमी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना जयराम देसाई यांनी व्यक्त केली. पुणे जिल्ह्याचा अभ्यास करून अनेकांना दिशा दिली आणि माणसे जोडण्याचे काम भोईटे यांनी केले, अशा शब्दांत ब्रिजमोहन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश फल्ले यांनी केले.

