पुणे : मोहम्मदवाडी परिसरात नवीन पाणी कनेक्शन मिळवून देण्यासाठी काही परवानाधारक प्लंबरांकडून ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम मागितली जात असल्याच्या चर्चेनंतर पुणे महानगरपालिकेने अधिकृत स्पष्टीकरण जारी केले आहे. नवीन पाणी कनेक्शनसाठी पाइपच्या आकार आणि व्यासानुसार निश्चित शुल्कच आकारले जाईल, त्याव्यतिरिक्त कोणालाही अतिरिक्त पैसे घेण्याचा अधिकार नसल्याचे मनपाने स्पष्ट केले.
Maharashtra Rain Update : शेतकरी आणि नागरिकांसाठी दिलासादायक बातमी !
महापालिकेच्या माहितीनुसार, नवीन पाणी जोडणीसाठी १/२ इंच घरगुती कनेक्शनचे शुल्क १,४७५ रुपये, ३/४ इंच कनेक्शनसाठी २,९४६ रुपये आणि १ इंच कनेक्शनसाठी ७,७५७ रुपये निश्चित करण्यात आले आहे. मोठ्या व्यासाच्या कनेक्शनसाठी स्वतंत्र शुल्क लागू आहे. तसेच व्यावसायिक आणि बिगर-घरगुती पाणी जोडण्यांसाठीही वेगळी शुल्क रचना लागू करण्यात आली आहे.
याशिवाय वैयक्तिक सुरक्षा ठेव रक्कम म्हणून वैद्यकीय वापरासाठी १०,५४५ रुपये तर भाडेकरूंकरिता १२,९४५ रुपये ठेव निश्चित करण्यात आली आहे. सर्व शुल्कांची माहिती महापालिकेच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध असल्याचे प्रशासनाने सांगितले.
महापालिकेने स्पष्ट केले की मुख्य जलवाहिनीपासून इमारतीच्या मीटरपर्यंत सुमारे दोन मीटरपर्यंतची पाइपलाइन आणि आवश्यक कामे मनपामार्फत केली जातात. मात्र, मीटरपासून पाण्याच्या टाकीपर्यंतची अंतर्गत पाइपलाइन आणि नवीन इमारतीतील प्लंबिंगची कामे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत परवानाधारक प्लंबरांकडून करून घेणे बंधनकारक आहे.
मोहम्मदवाडीतील नव्याने उभारलेल्या पाण्याच्या टाक्यांच्या कार्यक्षेत्रात सुमारे ६० ते ७० इमारतींना अद्याप पाणीपुरवठा मिळालेला नसल्याने त्यांच्या नवीन कनेक्शनना मंजुरी देण्यात आलेली नाही. नागरिकांच्या सोयीसाठी ९ मे २०२६ रोजी विशेष सहाय्यता केंद्र आयोजित करण्यात आले होते. या माध्यमातून आतापर्यंत ४१ अर्ज प्राप्त झाले असून गरजेनुसार पुढेही अशी केंद्रे सुरू ठेवली जाणार आहेत.
दोराबजी पॅराडाइज परिसरातील तीन नवीन पाण्याच्या टाक्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. या भागातील सुमारे १,२०० ते १,५०० सोसायट्या आणि इमारतींना यापूर्वीच पाणी कनेक्शन देण्यात आल्याने जुन्या सोसायट्यांना नवीन कनेक्शन घेण्याची गरज नसल्याचेही मनपाने स्पष्ट केले.
अतिरिक्त किंवा अवाजवी रक्कम मागणाऱ्या परवानाधारक प्लंबरांविरोधात नागरिकांनी कार्यकारी अभियंता, लष्कर जलपुरवठा विभाग, सेंट बिशप हायस्कूलजवळ, जनरल भगत मार्ग, पुणे येथे लेखी तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

