23 दिवसांच्या संघर्षानंतर RMC उद्योग सुरू ; नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

महिनाभरात नियमांचे पालन न करणाऱ्या प्लांट्सवर कारवाईसाठी असोसिएशनचा इशारा ; नागरिकांसाठी हेल्पलाइन ही सुरू होणार

पुणे : पुणे आरएमसी असोसिएशनने 23 दिवसांपासून सुरू असलेला रेडी मिक्स काँक्रीट (RMC) उद्योगाचा बंद मागे घेतला असून, 9 मे 2026 पासून पुणे जिल्ह्यातील सर्व आरएमसी प्लांट्सचे कामकाज पुन्हा सुरू होणार आहे. वाढते प्रदूषण, ट्रान्झिट मिक्सरमुळे होणारे अपघात आणि नागरिकांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नोटिसा बजावल्यानंतर हा वाद निर्माण झाला होता.

 

असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर आणि सचिव सचिन काटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील आरएमसी प्लांट्स शहराबाहेर हलवले जाणार नाहीत. मात्र, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रशासनाच्या नियमांनुसार सर्व प्लांट चालकांनी आवश्यक सुधारणा करणे बंधनकारक राहील.

 

पुढील 30 दिवसांत धूळ नियंत्रण, सांडपाणी व्यवस्थापन, आवाज नियंत्रण, रस्ते स्वच्छता आणि ट्रान्झिट मिक्सरच्या सुरक्षित वाहतुकीसाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. जे प्लांट चालक या सुधारणा करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी असोसिएशन स्वतः प्रशासनाकडे पाठपुरावा करेल, असे काटे यांनी स्पष्ट केले.

 

9 मेपासून बुधवार, शनिवार आणि रविवारी सकाळी 6 ते सायंकाळी 5 या वेळेत प्लांट्स सुरू राहतील. नो-एंट्री रस्त्यांवर ट्रान्झिट मिक्सर वाहतूक सकाळी 8 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत बंद ठेवली जाणार आहे.

 

आरएमसी उद्योगासाठी स्वतंत्र नियमावली नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत होत्या. नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानंतर प्रशासनाने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील काही प्लांट्सना नोटिसा दिल्या होत्या. त्याविरोधात असोसिएशनने 23 दिवसांचा बंद पुकारला होता.

 

दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत 15 दिवसांत आरएमसी प्लांट्ससाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (SOP) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. असोसिएशनने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

 

असोसिएशनने जिल्ह्यातील 300 हून अधिक प्लांट चालकांची बैठक घेऊन त्यांच्याकडून हमीपत्र घेतले आहे. पर्यावरण रक्षण, रस्ते सुरक्षा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व नियमांचे पालन करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

 

तसेच नागरिकांना तक्रारी करता याव्यात यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू केली जाणार आहे. या हेल्पलाइनवर ट्रान्झिट मिक्सरची बेदरकार वाहतूक, वाहतूक नियमभंग, प्रदूषण, धूळ आणि प्लांट्समुळे होणाऱ्या त्रासाबाबत तक्रारी नोंदवता येणार आहेत. असोसिएशन या तक्रारी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा दावा करण्यात आला.

 

प्रशासन आणि संबंधित प्राधिकरणांनी सकारात्मक सहकार्य केल्याबद्दल असोसिएशनने आभार व्यक्त केले असून, प्रशासनाशी समन्वयातून उद्योगासमोरील अडचणी दूर झाल्याचे सांगितले.

 

महत्त्वाचे निर्णय

* 23 दिवसांनंतर RMC बंद मागे

* 9 मेपासून कामकाज पुन्हा सुरू

* प्लांट्स शहराबाहेर जाणार नाहीत

* 15 दिवसांत SOP तयार होणार

* 30 दिवसांत प्रदूषण नियंत्रण उपाय अनिवार्य

* नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईसाठी पाठपुरावा

* नागरिकांसाठी हेल्पलाइन सुरू होणार

Local ad 1