Pune Students Certificate Camp | विद्यार्थ्यांसाठी दाखले वितरणाची विशेष मोहिम राबवा ; रोहन सुरवसे पाटील

 

Pune Students Certificate Camp पुणे : इयत्ता 12 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आणि लवकरच 10 वीचा निकाल लागणार असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रवेशासाठी आवश्यक विविध दाखले वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहिम राबवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

 

Land Acquisition Corruption : भूसंपादनातील भ्रष्टाचारावर सरकारचा मोठा अ‍ॅक्शन !

 

प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, SEBC, नॉन-क्रीमीलेयर, EWS, डोमिसाइल यांसारख्या विविध कागदपत्रांची आवश्यकता असते. निकालानंतर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि पालक महा-ई-सेवा केंद्रे, सेतू कार्यालये आणि नागरी सुविधा केंद्रांमध्ये गर्दी करत असल्याने सर्व्हर डाऊन होण्याच्या समस्या वारंवार निर्माण होत आहेत.

 

गेल्या काही दिवसांपासून सर्व्हर डाऊनची समस्या अधिक गंभीर बनली असून, त्यामुळे नागरिकांना आवश्यक दाखले वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी आणि पालकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रवेश प्रक्रियेच्या महत्त्वाच्या टप्प्यावर कागदपत्रे वेळेत उपलब्ध न झाल्यास विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे संबंधित विभागाने तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून दाखले वितरण सुरळीत करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

 

तसेच पुणे शहर आणि जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शासकीय दरानुसार आणि वेळेत दाखले मिळावेत, यासाठी प्रशासनाने विशेष शिबिरे किंवा दाखला वितरण मोहिम राबवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

 

दरम्यान, अनेक महा-ई-सेवा केंद्रांमध्ये शासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रत्येक केंद्राच्या दर्शनी भागात शासनमान्य दरपत्रक लावणे बंधनकारक करावे, अशी मागणीही रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे. विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

 

Local ad 1