...

फिल्मी स्टाईल पाठलागानंतर मोठा भंडाफोड ; बनावट व्हिस्की रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साईज) पुणे भरारी पथकाने आंतरजिल्हा दारू तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. गोव्यातील स्वस्त दारू प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरून महाराष्ट्रात आणून ती नामांकित ब्रँडच्या बाटल्यांमध्ये भरून विक्री करणाऱ्या या टोळीचा इंदापूर परिसरात पाठलाग करून चित्रपटाच्या धर्तीवर पर्दाफाश करण्यात आला. या कारवाईत तब्बल २० लाख ५३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (goa liquor smuggling fake brand racket busted pune excise indapur)

 

 

या प्रकरणी प्रेम सोमनाथ भडवलकर (रा. बारामती) आणि अक्षय अधिकराव देशमुख (रा. सोलापूर) यांना अटक करण्यात आली असून, इतर काही आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.

 

उत्पादन शुल्क विभागाला कांडलगाव (ता. इंदापूर) परिसरात दारू तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार २७ मार्च रोजी कांडलगाव-शहा रोडवर सापळा रचून एका मालवाहू वाहनाला अडवण्यात आले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये दारूने भरलेले २५ प्लास्टिक ड्रम तसेच ‘रॉयल स्टॅग’ व्हिस्कीचे सुमारे १,४०० बनावट बुच (ढक्कन) आढळून आले.

त्यानंतर अटक आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे अक्षय देशमुख यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. तेथून गोवा निर्मित विदेशी दारू, रिकाम्या बाटल्या आणि सुमारे २,००० बनावट बुच जप्त करण्यात आले. या मुद्देमालाची किंमत सुमारे ४९ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

याच अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील महिमानगड येथे एका फरार आरोपीच्या घरावर छापा टाकून ‘इम्पीरियल ब्लू’ व्हिस्कीच्या बाटल्या आणि बनावट बुच मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले. तपासात असे समोर आले आहे की, आरोपी गोव्यातून स्वस्त दारू आणून ती महाराष्ट्रात रिकाम्या बाटल्यांमध्ये भरत होते आणि नामांकित ब्रँडच्या नावाने चढ्या दरात विक्री करत होते. या कारवाईमुळे आंतरजिल्हा दारू तस्करीच्या मोठ्या साखळीला मोठा धक्का बसला आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत गुन्हा क्रमांक ११४/२०२६ नोंदवण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२३ अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई निरीक्षक अशोक शितोळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात सत्यवान गोगावले, वालुंजकर, बोभाटे, रोहित माने, सागर साबळे, प्रदीप झुंजारुक, रवी लोखंडे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. पुढील तपास निरीक्षक शितोळे करत आहेत.

 

 

 

 

 

Local ad 1