...

पुण्यात कचरा डंपरचा बेदरकार प्रकार; नागरिकांचा जीव धोक्यात, प्रशासनावर संगनमताचे आरोप

पुणे : शहरातील वाहतूक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गोळीबार मैदान चौकाकडून लुल्ला नगर चौकाकडे येताना, 96 इव्हेन्यू मॉल रोडवर कमांड हॉस्पिटल ते गेरा जंक्शन सिग्नल दरम्यान उड्डाणपुलाजवळ पुणे महानगरपालिका च्या कचरा डंपर (MH12UF2205) ने विरुद्ध दिशेने येत समोरून येणाऱ्या वाहनाला धडक दिल्याची गंभीर घटना घडली.

 

 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, डंपर चालकाने अत्यंत बेदरकारपणे वाहन चालवत अपघात घडवला आणि नंतर घटनास्थळावरून पुढे गेला. संबंधित वाहनधारकाने डंपर अडवून जाब विचारला असता, चालकाकडे ना ड्रायव्हिंग लायसन्स होते, ना कोणतेही ओळखपत्र. याशिवाय सीटबेल्टचाही वापर केला नव्हता. उलट, “आम्ही अत्यावश्यक सेवेत आहोत” असे सांगत नागरिकांनाच धमकावण्याचा प्रयत्न करण्यात आला.

 

 

या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, पुणे पोलीस प्रशासनाने सुरुवातीला टाळाटाळ करत अखेरीस केवळ NC (Non-Cognizable) नोंदवली. धक्कादायक बाब म्हणजे, नोंदवलेल्या तक्रारीत वाहनाचा चुकीचा नंबर नमूद करण्यात आला असून चालकाची कोणतीही माहिती नोंदवलेली नाही. याशिवाय पोलिसांकडून “PTP ॲपवर फोटो अपलोड करा, दंड होईल” असा सल्ला देण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

 

 

या घटनेवर प्रतिक्रिया देताना अक्षय जैन यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, महानगरपालिकेचे कंत्राटदार, संबंधित अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांच्या संगनमतामुळेच अशा प्रकारची बेफिकीर व्यवस्था सुरू आहे.

 

यापूर्वीही अशाच घटनांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. पोलीस आयुक्तांनी वारंवार सूचना देऊनही ठोस अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. “प्रत्येक वेळी बातम्या, आश्वासने आणि नंतर विस्मरण” असा क्रम सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.

“संबंधित कर्मचारी सत्ताधाऱ्यांचं नाव घेऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत होता. पुणे महानगरपालिका कंत्राटदारांना नियम मोडण्याचा मोकळा परवाना देत आहे का? पोलीस प्रशासन जाणूनबुजून कारवाई टाळत आहे का? नागरिकांचा जीव गेला तरच प्रशासन जागं होतं.”
अक्षय जैन, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

 

Local ad 1