पुणे : पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६-२७ च्या १५ हजार ६६९ कोटींच्या अर्थसंकल्पात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आपल्या नगरसेवकांसाठी तिजोरी खुली केली असून, विरोधी पक्षाच्या प्रभागांना मात्र डावलले असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे नगरसेवक अरविंद शिंदे यांनी केला आहे. विशेषतः नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी राखीव असलेल्या ११ कोटी ६० लाखांच्या निधीत मोठा भेदभाव झाल्याचे समोर आले आहे. (pune pmc budget 2026 arvind shinde criticizes bjp health fund bias)
केवळ भाजपच्या प्रभागातच ‘आरोग्य’ तपासणी?
स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात प्रभागातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी ११ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद केली आहे. मात्र, हा निधी देताना ज्या प्रभागांमध्ये भाजपचे ११९ नगरसेवक निवडून आले आहेत, केवळ त्याच भागांना १५ ते २० लाखांचा निधी देण्यात आल्याची माहिती अरविंद शिंदे यांनी सभागृहात दिली. संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य आजारांच्या तपासणीसाठी असलेल्या या योजनेतून विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना जाणीवपूर्वक वंचित ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
“पराभवाचा राग मतदारांवर काढू नका”
अरविंद शिंदे यांनी भाषणात सत्ताधाऱ्यांच्या ‘कृपादृष्टी’वर टीका करताना म्हटले की, “निवडणुकीतील पराभवाचा राग हा संबंधित प्रभागातील नागरिकांवर काढणे ही लोकशाहीसाठी घातक बाब आहे. भाजपचे उमेदवार निवडून आले नाहीत म्हणून तिथल्या मतदारांना आरोग्य सुविधेपासून लांब ठेवणे हा अन्याय आहे. शहराचा विकास आणि आरोग्य सेवा देताना असा दुजाभाव करणे निषेधार्ह आहे.”
११८ योजनांमध्ये भेदभावाचा आरोप
महापालिकेच्या या अर्थसंकल्पात एकूण ११८ नव्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या नगरसेवकांच्या प्रभागात अत्यंत कमी निधी देऊन त्यांच्या कामांना खीळ घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर स्वतःच्याच नगरसेवकांचे प्रभाग सजवल्याचे चित्र बजेटमधून स्पष्ट होत आहे.

