...

पुणे मनपात स्वीकृत नगरसेवकांवर राजकीय मोहर ; अंतिम मंजुरी बाकी ; कोणाची लागली वर्णी ?

पुणे : पुणे महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध पक्षांत दीर्घ चर्चेनंतर बहुतांश नावे जवळपास निश्चित झाली असून आता या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होण्यासाठी सर्वसाधारण सभेची मंजुरी बाकी आहे. यावेळी सभागृहातील पक्षांच्या संख्याबळानुसार भाजपला ७, राष्ट्रवादी काँग्रेसला २ आणि काँग्रेसला १ अशा एकूण १० स्वीकृत नगरसेवक पदांचा वाटा मिळणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांमध्ये या पदांसाठी इच्छुकांची मोठी गर्दी आणि अंतर्गत स्पर्धा पाहायला मिळाली.

 

महानगरपालिका प्रशासनाने स्वीकृत नगरसेवक पदासाठी सोमवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत अधिकृत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया निश्चित केली होती. मात्र त्यापूर्वीच बहुतांश पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे जवळपास अंतिम केली आहेत. आता या नावांवर सर्वसाधारण सभेत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

 

महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ५ (२) नुसार स्वीकृत नगरसेवकांची निवड सभागृहातील पक्षांच्या संख्याबळाच्या आधारे संबंधित गटनेत्यांशी चर्चा करून केली जाते. त्यानंतर आयुक्त, महापौर आणि इतर गटनेत्यांशी सल्लामसलत करून प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर मांडला जातो. सभेला कोणतेही नाव नाकारण्याचा अधिकार असला तरी त्यासाठी कारण नोंदवणे बंधनकारक असते.

 

भाजपला सर्वाधिक सात जागा

सभागृहात बहुमत असल्याने यावेळी भाजपला स्वीकृत नगरसेवकांच्या सर्वाधिक सात जागा मिळाल्या आहेत. या सात जागांसाठी पक्षात सुमारे ४०० पेक्षा अधिक इच्छुक असल्याची माहिती समोर आली होती. मर्यादित जागांमुळे निवड प्रक्रिया पक्षासाठी आव्हानात्मक ठरली. भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या नावांमध्ये राजेंद्र काकडे, उदय लेले, विश्वास ननवरे, प्रियंका शेंडगे, रविंद्र साळेगावकर, जयप्रकाश पुरोहित आणि निलेश कोंढाळकर यांचा समावेश आहे.

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनुभव आणि युवा नेतृत्वाला संधी

राष्ट्रवादी काँग्रेसला यावेळी दोन स्वीकृत नगरसेवक पदे मिळाली आहेत. पक्षाने अनुभव आणि युवा नेतृत्वाचा समतोल साधत माजी महापौर दत्तात्रय धनकवडे आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राकेश कामठे यांची निवड केली आहे. दत्तात्रय धनकवडे हे २०१४ मध्ये पुण्याचे महापौर राहिले असून धनकवडी, बालाजी नगर आणि आंबेगाव परिसरात त्यांचा प्रभाव मानला जातो. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर राकेश कामठे यांना संधी देऊन पक्षाने युवा नेतृत्वाला पुढे आणण्याचा संदेश दिला आहे.

 

काँग्रेसचा कामगार नेत्यावर विश्वास

काँग्रेसच्या वाट्याला यावेळी केवळ एक स्वीकृत नगरसेवक पद आले आहे. या जागेसाठी अनेक वरिष्ठ नेत्यांनी दावेदारी केली होती आणि राज्य तसेच दिल्ली पातळीवरही चर्चा झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. अखेर पक्षाने कामगार नेता सुनील शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची निवड केली आहे. श्रमिक वर्गात सक्रिय असलेले शिंदे संघटनेला बळकटी देतील, अशी अपेक्षा काँग्रेस नेतृत्वाने व्यक्त केली आहे.

 

 

अंतिम मंजुरीची प्रतीक्षा

स्वीकृत नगरसेवकांची नावे जवळपास निश्चित झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेकडे लागले आहे. या सभेत या नावांना औपचारिक मंजुरी मिळाल्यानंतरच स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.

 

 

Local ad 1