...

पुण्यात IVF केंद्रांतील औषध विक्री व लिंग तपासणी गैरप्रकारांची चौकशी करा – रोहन सुरवसे

पुणे : शहरात वेगाने वाढत असलेल्या IVF (संतान उपचार) केंद्रांमध्ये आर्थिक अनियमितता तसेच औषधांच्या विक्रीतील कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

 

पुणे शहरातील वृक्ष गणनेचा प्रस्ताव अडकला ; निधी देण्यास समितीचा नकार

 

निवेदनात म्हटले आहे की, मागील काही वर्षांत पुणे शहरात मोठ्या प्रमाणात IVF केंद्रे सुरू झाली आहेत. संतानप्राप्तीसाठी उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना अनेक ठिकाणी आवश्यक औषधे संबंधित केंद्रातूनच खरेदी करण्यास भाग पाडले जाते. ही औषधे बाहेरील मेडिकल दुकानांमध्ये उपलब्ध नसल्यामुळे उपचारासाठी येणाऱ्या दाम्पत्यांचे आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

याशिवाय काही IVF केंद्रांशी संबंधित सोनोग्राफी केंद्रांमध्ये गर्भलिंग तपासणी केली जात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. उरळी कांचन येथील दीप्ती चौधरी या महिलेच्या आत्महत्येनंतर वडगाव शेरी परिसरातील एका नामांकित रुग्णालयात लिंग तपासणी झाल्याची चर्चा समोर आल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

सध्या पुणे महानगरपालिका आरोग्य विभागाकडून शहरातील सोनोग्राफी केंद्रांची वर्षातून दोन वेळा तपासणी केली जाते. मात्र ही तपासणी केवळ औपचारिकता ठरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निर्धारित फॉर्ममध्ये माहिती भरणे, नोंदींची प्राथमिक तपासणी करणे आणि किरकोळ नोटीस देऊन कारवाई पूर्ण झाल्याचे दाखवले जाते, अशी टीकाही करण्यात आली आहे.

 

अवैध बांधकाम आढळल्यास थेट इंजिनिअरवर कारवाई ; महापालिकेचा इशारा

 

या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व IVF आणि सोनोग्राफी केंद्रांची संयुक्त व सखोल विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी सुरवसे यांनी केली आहे. तसेच औषधांची विक्री व बिलिंग प्रक्रियेची चौकशी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करावी आणि PCPNDT Act अंतर्गत लिंग तपासणी प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक नेमावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

 

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या केंद्रांची मान्यता तात्काळ निलंबित किंवा रद्द करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. यावर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पुणे शहरासह जिल्ह्यातील IVF केंद्रांची सखोल तपासणी केली जाईल आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.

 

 

 

 

 

Local ad 1