पुणे : पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीच्या काठ सुधार योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील संगमवाडी येथील नदीवरील पुलापासून बंडगार्डन येथील गणेश घाटापर्यंतचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. या टप्प्यात विकसित करण्यात आलेला बंडगार्डन गणेश घाटावरील नदीकाठ ट्रॅक यापूर्वीच नागरिकांसाठी खुला करण्यात आला असून, आता संगमवाडी येथील नदीकाठचा जॉगींग ट्रॅक देखील वापरासाठी खुला होत आहे. (mula mutha riverfront sangamwadi bundgarden jogging track)
महापालिकेच्या नदीकाठ सुधार प्रकल्पाअंतर्गत एकूण ११ टप्प्यांत मुळा-मुठा नदीकाठाचा विकास करण्यात येणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात संगमवाडी ते बंडगार्डन गणेश घाटापर्यंत सुमारे ३.७ किलोमीटर लांबीच्या नदीकाठ विकासाचे काम हाती घेण्यात आले होते. संगमवाडी येथील स्मशानभूमीजवळील जागा लष्कराकडून ताब्यात येण्यास काहीसा विलंब झाला असला, तरी उर्वरित काम मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाले आहे.
पुण्याची 10वी महिला महापौर कोण ? भाजपमधील ‘या’ नावामुळे राजकीय वर्तुळात खळबळ !
या प्रकल्पाची सुरुवात बंडगार्डन येथील गणेश घाट परिसरातून करण्यात आली होती. साधारण एका वर्षाच्या कालावधीत येथे सुमारे ७०० मीटर नदीकाठ विकासाचे काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी जॉगींग ट्रॅकसह नागरिकांसाठी बसण्याकरिता पायऱ्या तयार करण्यात आल्या आहेत. हाच पॅटर्न संगमवाडी येथील पाटील इस्टेटच्या पलीकडील तीरापर्यंत राबविण्यात आला आहे.
रिअल इस्टेटमध्ये मोठी झेप ! पुणेकरांनी केली ‘इतक्या’ हजार कोटींची घरखरेदी। Pune Housing Report 2025
विशेष म्हणजे संगमवाडी येथे मुळा-मुठा नदीच्या संगमस्थळी नदीपात्राच्या दिशेने उतरत जाणाऱ्या आकर्षक पायऱ्या विकसित करण्यात आल्या असून, येथे एकावेळी सुमारे दोन हजारांहून अधिक नागरिक बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, लाल मातीचा चालण्यासाठीचा ट्रॅक, सायकल ट्रॅकसदृश रचना, वृक्षारोपण तसेच नदीपात्रात पिचिंग करून त्यावर फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसराचे रुपडे पालटले आहे.
सध्या नागरिकांनी सकाळ-संध्याकाळी फिरण्यासाठी या ट्रॅकचा वापर सुरू केला आहे. विशेषतः संगमवाडी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची येथे मोठी उपस्थिती दिसून येत आहे. वर्दळीच्या रस्त्यापासून काही अंतरावर असल्याने या जॉगींग ट्रॅकवर प्रदूषणमुक्त वातावरण, स्वच्छ हवा आणि शांतता मिळत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. मात्र, सुरक्षेसाठी आवश्यक व्यवस्था तसेच रस्ता ओलांडण्यासाठी वाहनांची गती कमी करणारे गतीरोधक किंवा पादचारी अंडरपासची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
“नदीकाठ सुधार योजनेत सुरू असलेल्या संगमवाडी ते बंडगार्डन दरम्यानच्या जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. संगमवाडी येथील संगम घाटाचे कामही किरकोळ कामे वगळता पूर्ण झाले आहे. घाटावर प्रवेश मार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल. तसेच लॉर्ड वेलस्ली पुलाजवळील घाटापासून बंडगार्डन पुलादरम्यानचे कामही पुढील काही महिन्यांत पूर्ण करण्यात येईल. नागरिकांनी ट्रॅकचा वापर सुरू केला असून, लवकरच येथे पिकनिक स्पॉटसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा सुरू करण्यात येतील.” — प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका
❓ प्रश्न-उत्तर
प्र. मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पाचा पहिला टप्पा कुठे आहे?
उ. पहिला टप्पा संगमवाडी येथील पुलापासून बंडगार्डन येथील गणेश घाटापर्यंत आहे.
प्र. या टप्प्यात किती अंतराचे काम करण्यात आले आहे?
उ. सुमारे ३.७ किलोमीटर अंतराचे नदीकाठ विकासाचे काम करण्यात आले आहे.
प्र. संगमवाडी येथील जॉगींग ट्रॅक नागरिकांसाठी खुला आहे का?
उ. होय, संगमवाडी येथील नदीकाठचा जॉगींग ट्रॅक आता नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे.
प्र. या प्रकल्पात कोणत्या सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत?
उ. जॉगींग ट्रॅक, बसण्यासाठी पायऱ्या, सायकल ट्रॅक, विद्युत रोषणाई, वृक्षारोपण आणि फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे.
प्र. नागरिकांनी कोणत्या अतिरिक्त मागण्या केल्या आहेत?
उ. सुरक्षा व्यवस्था, गतीरोधक तसेच पादचारी अंडरपासची मागणी नागरिकांनी केली आहे.



