दिलेला शब्द २४ तासांत पूर्ण ; राघवेंद्र बाप्पु मानकर अॅक्शन मोडवर
hirabag society garbage problem solved raghavendra bappu mankar pune
पुणे : हिराबाग हाउसिंग सोसायटी येथील एसआरए प्रकल्पातील अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न अवघ्या २४ तासांत नवनिर्वाचित नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी मार्गी लावला आहे. इमारतीतील डक्टमध्ये साठणाऱ्या कचऱ्यामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधी व डासांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संपूर्ण इमारतीत जाळ्या बसवण्याच्या कामाला आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने सुरुवात करण्यात आली आहे. (hirabag society garbage problem solved raghavendra bappu mankar pune)
निवडणूक प्रचारादरम्यान या इमारतीतील रहिवाशांनी कचऱ्याच्या समस्येबाबत राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या निदर्शनास आणून दिले होते. निवडणुकीनंतर ही समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्या अनुषंगाने त्यांनी प्रत्यक्ष सोसायटीला भेट देऊन पाहणी केली आणि तात्काळ उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले.
या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून डक्टमधून कचरा टाकण्यास प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक मजल्यावर जाळ्या बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, निर्णय घेतल्यानंतर अवघ्या २४ तासांत प्रत्यक्ष कामाला ही सुरुवात झाली आहे. समस्या पूर्णपणे सुटेपर्यंत सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन मानकर यांनी रहिवाशांना दिले आहे.
डक्टमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साठल्याने दुर्गंधी, डास व आरोग्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. वारंवार स्वच्छता करूनही समस्या कायम राहात असल्याने, ९ मजली इमारतीत ६०० हून अधिक जाळ्या बसवण्यात येणार आहेत. यासोबतच नागरिकांना डस्टबिनचे वाटप करून ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती देखील करण्यात येणार आहे.
दिलेल्या शब्दाची तातडीने पूर्तता केल्याबद्दल हिराबाग सोसायटीतील रहिवाशांनी राघवेंद्र बापू मानकर यांचे आभार मानले. यावेळी शंकर तावरे, सचिन मुजुमले, संदीप गायकवाड, संतोष वाटमकर, पांडुरंग जावळकर, दत्ता इंगळे यांच्यासह सोसायटीतील सदस्य व नागरिक उपस्थित होते.

