पुण्यातील शंभराव्या मराठी साहित्य संमेलनासाठी १४ जूनला मोठी घोषणा

100th marathi sahitya sammelan पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पुण्यात आयोजित होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची घोषणा १४ जून रोजी केली जाणार आहे. या संमेलनासाठी सहसंयोजक म्हणून लोकहितवादी यांनी स्थापन केलेले पुणे नगर वाचन मंदिर आणि पुणे पुस्तक महोत्सव या दोन संस्था इच्छुक असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी दिली.

 

रविवारी झालेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सोमण यांनी ही माहिती दिली. यावेळी प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर उपस्थित होते.

 

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत शंभराव्या साहित्य संमेलनासाठी स्थळ निवड समिती स्थापन करण्यात आली. या समितीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष यांच्यासह प्रतिभा सराफ (मुंबई मराठी साहित्य संघ), रामचंद्र काळुंखे (मराठवाडा साहित्य परिषद) आणि लखनसिंह कटारे (विदर्भ साहित्य संघ) यांचा समावेश आहे.

 

ही समिती १२ आणि १३ जून रोजी पुण्यातील संभाव्य संमेलन स्थळांची पाहणी करणार आहे. समितीचा अहवाल १४ जून रोजी होणाऱ्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत सादर केला जाईल. त्याच दिवशी अंतिम स्थळ निश्चित करून अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

 

योगेश सोमण म्हणाले की, सातारा येथे झालेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातच शंभरावे संमेलन पुण्यात घेण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आता आयोजनाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे.

 

दरम्यान, ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे हिशोब अद्याप साहित्य महामंडळाकडे सादर झाले नसल्याची माहिती कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी दिली. या संदर्भात संबंधित पदाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करण्यात आला असून अद्याप उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे महामंडळाच्या वतीने नव्याने पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

 

 

 

Local ad 1