सोमेश्वर कारखान्यात बंडखोरांना मतदारांनी जागा दाखवली : उमेश पाटील
अजित पवार हयात नसताना त्यांच्या कुटुंबाशी प्रतारणा; सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर मतदारांचा विश्वास, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्याची टीका
पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मतदारांनी अजित पवार यांच्या कुटुंबाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. अजित पवार हयात नसताना त्यांच्या कुटुंबाशी प्रतारणा करणाऱ्यांना मतदारांनी जागा दाखवली, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली. या निवडणुकीत ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’ने घवघवीत यश मिळविले आहे.
एमपीएससी पेपरफुटीच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती; दोन महिन्यांत अहवाल
निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, स्वीकृत नगरसेवक राकेश कामठे आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, “या निवडणुकीचा संदेश केवळ सोमेश्वर कारखान्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला आहे. काही नेते आणि पदाधिकारी सोबत नसले, तरी सर्वसामान्य मतदार अजित पवार यांच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, हे निकालाने दाखवून दिले आहे.” कारखान्याच्या यशाचे श्रेय केवळ अध्यक्षांच्या कारभाराला देता येणार नाही. त्यामागे अजित पवार यांचे नेतृत्व महत्त्वाचे होते. कारखान्याची पुढील वाटचाल पवार कुटुंबाच्या नेतृत्वाखाली व्हावी, याला मतदारांनी कौल दिल्याचे त्यांनी सांगितले.
पुरुषोत्तम जगताप यांच्यावर बंडखोरीचा आरोप
सोमेश्वर कारखान्याचे १३ वर्षे अध्यक्ष राहिलेले पुरुषोत्तम जगताप यांनी ऐनवेळी दगाबाजी केल्याचा आरोप पाटील यांनी केला. त्यांचे बंड अचानक झाले नसून त्याची तयारी आधीपासूनच सुरू होती, असा दावाही त्यांनी केला. “एका रात्रीत पॅनेल, बॅनर, व्यासपीठ आणि प्रचाराचे नियोजन तयार होत नाही. इतर पक्षांशी चर्चा करून त्यांचा पाठिंबाही एका रात्रीत मिळवता येत नाही,” असे पाटील म्हणाले.
अजित पवार यांच्यानंतर कार्यकर्त्यांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व खंबीर असल्याचे या निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे, असे त्यांनी सांगितले. अजित पवार यांच्यावर प्रेम असल्याचे सांगणाऱ्यांनी त्यांच्या अनुपस्थितीत कुटुंबाच्या पाठीशी उभे राहायला हवे होते, अशी टीकाही त्यांनी केली.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी सहा तास प्रतीक्षा केली होती. मात्र, पुरुषोत्तम जगताप यांनी ऐनवेळी भूमिका बदलली. ही बाब मतदारांना मान्य नसल्याचे निवडणूक निकालातून दिसून आल्याचा दावा पाटील यांनी केला.
संजय जगताप यांच्याशी शेवटपर्यंत चर्चा
पुरंदर तालुक्याच्या प्रतिनिधित्वावरून संजय जगताप यांच्याशी निवडणुकीच्या आदल्या दिवसापर्यंत चर्चा सुरू होती. दोन जागांवरील उमेदवार पवार कुटुंबानेच ठरवावेत, अशी भूमिका संजय जगताप यांनी मांडली होती. मात्र, नंतर त्यांनी भूमिका बदलल्याचा आरोप पाटील यांनी केला.
बंडखोरांना भाजपचा नेमका किती पाठिंबा होता, हे निश्चितपणे सांगता येणार नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र, भाजपच्या जिल्ह्यातील जबाबदार नेत्यांनी बारामती, पुरंदर आणि सातारा परिसरातील कार्यकर्त्यांना पवार कुटुंबाच्या नेतृत्वाखालील पॅनेलला मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या, असा दावाही त्यांनी केला.

