पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकांसाठी जाहीर केलेल्या प्रभाग रचनेवर नागरिक आणि राजकीय पक्षांचा तीव्र विरोध उमटला आहे. अंतिम मुदतीपर्यंत तब्बल ५,४९६ हरकती दाखल झाल्या असून, केवळ शेवटच्या दिवशीच २,८९९ हरकती नोंदल्या गेल्या. नऱ्हे–वडगाव बु. प्रभागातून सर्वाधिक हरकती दाखल झाल्या आहेत.
पुणे महापालिकेत 30 ते 46% कमी दरांनी निविदा ; कामाचा दर्जा धोक्यात?
२०१७ च्या निवडणुकीत साडेतीन हजारांहून अधिक हरकती झाल्या होत्या, यंदा मात्र त्यापेक्षा जास्त हरकती दाखल झाल्या आहेत. बुधवारी ९६६ हरकती दाखल झाल्या होत्या, परंतु गुरुवारी ही संख्या तीनपट वाढून २,८९९ वर पोहोचली. या सर्व हरकतींवर आता जनसुनावणी होणार असून, त्यासाठी राज्य सरकारने सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्हि. राधा यांची नियुक्ती केली आहे.
शहरातील सर्वाधिक २,०६६ हरकती प्रभाग क्र. ३४ (नऱ्हे – वडगाव बु.) येथे दाखल झाल्या. ८१९ हरकती विमाननगर – लोहगाव (प्रभाग ३) येथे, तर ५५८ हरकती मांजरी बु.– साडेसतरा नळी (प्रभाग १५) येथे झाल्या. केवळ ४ प्रभागांवरच ३,६९४ हरकती झाल्या, तर उर्वरित ३७ प्रभागांवर मिळून १,८०२ हरकती नोंदल्या गेल्या. प्रभाग क्र. २५ (शनिवारी पेठ – महात्मा फुले मंडई), प्रभाग क्र. २९ (डेक्कन जिमखाना – हॅप्पी कॉलनी) आणि प्रभाग क्र. ३० (कर्वेनगर – हिंजवडी होम कॉलनी) येथे एकही हरकत दाखल झालेली नाही.
बहुसदस्यीय प्रभागांवर वंदना चव्हाण यांची टीका
माजी खासदार वंदना चव्हाण यांनी राज्य सरकारने जाहीर केलेली बहुसदस्यीय (चार सदस्यीय) प्रभाग रचना ही असंवैधानिक व लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, संविधानाच्या कलम २४३आर नुसार प्रत्येक प्रभागातून एकच प्रतिनिधी निवडला जावा. बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळे नागरिकांचे थेट प्रतिनिधित्व संपुष्टात येईल. स्थानिक समस्यांवर जबाबदार प्रतिनिधीच उरणार नाही आणि विकासकामे अडकतील. त्यामुळे त्यांनी सरकारकडे एक सदस्यीय प्रभाग रचना जाहीर करण्याची मागणी केली आहे.