...

Pune Municipal Election 2025 । पुणे महापालिकेत भाजप–शिवसेना युती धूसर, अर्ज माघारीपूर्वीही तोडगा नाही

 

Pune Municipal Election 2025 । पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशीही शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप यांच्यात युती होण्याची चिन्हे दिसत नाहीत. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचे सूत्र न जमल्यामुळे मैत्रीपूर्ण लढत हाच एकमेव पर्याय उरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत भाजप–शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जागावाटपावर एकमत झाले नाही. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज आणि एबी फॉर्म वाटप केले. दुसरीकडे, भाजपने अद्यापही शिवसेनेला १६ जागा देण्याची तयारी असल्याचे संकेत दिले आहेत.

 

 

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेसह युती होईल, असा विश्वास व्यक्त केला. मात्र, स्थानिक पातळीवर जागांबाबत एकमत न झाल्याने अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. शिंदे गटाकडे सध्या पुणे महापालिकेत केवळ एकच नगरसेवक असताना मोठ्या संख्येने जागांची मागणी व्यवहार्य नसल्याचेही मोहोळ यांनी सूचित केले.

 

 

भाजपने सुरुवातीपासून शिवसेनेसोबत युतीचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात १६५ पैकी सर्वच जागांवर भाजपने उमेदवार उभे केले आहेत. तर शिंदे गटाच्या शिवसेनेने तब्बल २६ प्रभागांत १०० हून अधिक उमेदवार उभे करत भाजपसमोर थेट राजकीय आव्हान निर्माण केले आहे.

 

 

युतीचा अंतिम निर्णय झाला तरी मोठ्या प्रमाणावर दिलेले एबी फॉर्म आणि भरलेले उमेदवारी अर्ज माघारी घेणे हे दोन्ही पक्षांसाठी मोठे आव्हान ठरणार आहे. भाजपमध्ये उमेदवारी नाकारल्यामुळे आधीच नाराजी आहे. अशा स्थितीत शिवसेनेसाठी जागा सोडण्यासाठी भाजपला स्वतःच्या उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यास सांगावे लागण्याची शक्यता आहे.

 

 

शिंदे गटाने सुरुवातीला ४० ते ४५ जागांची मागणी केली होती, तर भाजप मर्यादित जागांवरच ठाम होता. चर्चेअंती भाजपने १६ जागांची तयारी दर्शवली होती. मात्र, भाजपसोबत जाण्याबाबत शिंदे गटात स्थानिक पातळीवर एकमत झाले नाही. शहरप्रमुख नाना भानगिरे यांनीही पक्षाच्या बैठकीतून काढता पाय घेतल्याचे सांगितले जाते. यानंतर शिवसेनेतील अंतर्गत वाद वाढत गेले आणि अखेर मोठ्या संख्येने एबी फॉर्म वाटप करून उमेदवार मैदानात उतरवण्यात आले.

 

 

जर दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी युतीचा निर्णय घेतला, तर भाजपला अंदाजे १५ ते २० जागांवरील उमेदवारांचे अर्ज माघारी घ्यावे लागतील, तर शिंदे गटासमोर ८० हून अधिक उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्याचे कठीण आव्हान उभे राहील. मात्र, अर्ज माघारी घेण्याची मुदत आज संपत असल्याने, एवढ्या कमी वेळेत युती आणि माघारीचा निर्णय होण्याची शक्यता कमी असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

शिंदे गटाच्या शिवसेनेने उमेदवार उभे केलेले प्रभाग

प्रभाग क्र. 1, 3, 5, 6, 10, 11, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 24, 30, 32, 33, 34, 36, 37, 38, 39, 40, 41

 

 

❓ FAQ (प्रश्न–उत्तर)

प्र.1 : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप–शिवसेना (शिंदे) युती का अडचणीत आली आहे?
उ. जागावाटपावर एकमत न झाल्याने आणि दोन्ही पक्षांनी मोठ्या प्रमाणावर उमेदवार उभे केल्यामुळे युती अडचणीत आली आहे.

प्र.2 : भाजप शिवसेनेला किती जागा देण्यास तयार होता?
उ. भाजपने शिवसेनेला १६ जागा देण्याची तयारी दर्शवली होती.

प्र.3 : शिंदे गटाने किती प्रभागांत उमेदवार दिले आहेत?
उ. शिंदे गटाच्या शिवसेनेने २६ प्रभागांत १०० हून अधिक उमेदवार उभे केले आहेत.

प्र.4 : युती झाली तर कोणत्या पक्षासमोर मोठे आव्हान असेल?
उ. युती झाल्यास शिंदे गटासमोर ८० हून अधिक उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्याचे मोठे आव्हान असेल.

 

Local ad 1