पुणे | प्रतिनिधी
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ मधील भाजपाच्या अधिकृत उमेदवार पूजा मोरे–जाधव यांना अखेर आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर सुरू असलेल्या तीव्र ट्रोलिंगमुळे आणि जुनी कथित विधाने व्हायरल झाल्याने त्यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी मागे घेतल्याची घोषणा केली. यावेळी त्यांचे पती धनंजय जाधव उपस्थित होते. (bjp candidate pooja more jadhav withdraws nomination pune)
भाजपने प्रभाग क्रमांक २ साठी पूजा मोरे–जाधव यांना अधिकृत उमेदवारी दिली होती. मात्र त्यांच्या कथित जुन्या वक्तव्यांवरून सोशल मीडियावर टीकेचा भडिमार सुरू झाला. पूजा मोरे यांनी आपल्या विधानांचा विपर्यास झाल्याचा दावा करत खुलासा केला, तरीही ट्रोलिंग न थांबल्याने अखेर त्यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली.
“आम्ही सोशल मीडियाचे बळी ठरलो” – धनंजय जाधव
पत्रकार परिषदेत धनंजय जाधव म्हणाले, “माझ्या पत्नीच्या तोंडी शब्द घालण्यात आले. मराठा आरक्षण आंदोलनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीबाबत जे विधान व्हायरल करण्यात आले, ते पूजा जाधव यांनी केलेले नाही. तसेच पहलगाम हल्ल्याबाबत त्यांच्या प्रतिक्रियेचेही चुकीचे सादरीकरण करण्यात आले.”
पूजा मोरे–जाधव या मूळच्या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील असून, लग्नानंतर पुण्यात वास्तव्यास आल्या. लग्नापूर्वी त्या मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय होत्या. मूक मोर्चा आणि विविध आंदोलनांत त्यांनी सहभाग घेतला होता. याच काळातील एका आंदोलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीबाबत विधान केल्याचा दावा काही सोशल मीडिया हँडल्सवर करण्यात आला. मात्र, “हे विधान माझे नव्हते. ते बीडच्या परळीतील एका तरुणीचे होते,” असा दावा पूजा जाधव यांनी केला.
पत्रकार परिषदेत भावूक झाल्या पूजा जाधव
पत्रकार परिषदेत बोलताना पूजा जाधव भावूक झाल्या. “आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत कठीण आहे. गेवराई तालुक्यातील सामान्य शेतकरी कुटुंबातून मी संघर्ष करत इथपर्यंत आले. शेतकऱ्यांसाठी काम करताना माझ्यावर गुन्हे दाखल झाले, पोलीस ठाण्यात दिवस-दिवस काढले. तरीही संघर्ष थांबवला नाही,” असे सांगताना त्या रडू लागल्या. छत्रपती संभाजीराजे यांच्या मराठा क्रांती मोर्चामध्ये काम करत असताना धनंजय जाधव यांच्याशी ओळख झाली आणि पुढे विवाह झाला, असेही त्यांनी सांगितले. “लग्नानंतर लगेचच प्रभागात काम सुरू केले. पहलगाम हल्ल्यानंतर दिलेल्या एका तासातील प्रतिक्रियेचा विपर्यास करण्यात आला. नंतरच्या स्पष्टीकरणाकडे दुर्लक्ष करण्यात आले,” असे त्या म्हणाल्या.
विरोधकांच्या षडयंत्राचा आरोप
“निवडणूक अर्ज पूर्णतः मागे”
शेवटी पूजा जाधव यांनी आपण सर्व निवडणूक अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले. “वाघीण जखमी झाली तरी ती अधिक ताकदीने उभी राहते. मी पुन्हा जोमाने काम करेन,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

