ICPC 2026: पुण्यात प्रथमच कोडिंग स्पर्धा; IIIT पुण्याची निवड 

पुणे : जगातील प्रतिष्ठित विद्यापीठस्तरीय कोडिंग स्पर्धांपैकी एक असलेल्या इंटरनॅशनल कॉलेजिएट प्रोग्रामिंग काँटेस्ट (ICPC) 2026च्या कानपूर मल्टी-साइट प्रादेशिक स्पर्धेच्या ऑनसाइट केंद्रांपैकी एक केंद्र पुण्यात होणार आहे. या केंद्रासाठी भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIIT) पुणेची निवड झाली आहे. त्यामुळे प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही प्रतिष्ठित कोडिंग स्पर्धा पुण्यात आयोजित केली जाणार आहे.

 

ICPC कानपूर मल्टी-साइट 2026 प्रादेशिक स्पर्धेची मुख्य केंद्राची जबाबदारी सीएसजेएम विद्यापीठ, कानपूरकडे राहणार आहे. तर IIIT पुणे आणि आयआयटी गांधीनगर ही दोन ऑनसाइट उपकेंद्रे म्हणून सहभागी होणार आहेत. तिन्ही केंद्रांवरील स्पर्धेची शैक्षणिक चौकट, नियम आणि निवड प्रक्रिया समान राहणार आहे. ही स्पर्धा २२ आणि २३ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित केली जाणार आहे.

 

कोडिंग स्पर्धांची ‘ऑलिम्पिक’

इंटरनॅशनल कॉलेजिएट प्रोग्रामिंग काँटेस्ट अर्थात ICPCला विद्यापीठस्तरीय कोडिंग स्पर्धांची ‘ऑलिम्पिक’ म्हणून ओळखले जाते. या स्पर्धेत जगभरातील संगणकशास्त्रातील गुणवंत विद्यार्थी तीन सदस्यीय संघांच्या माध्यमातून सहभागी होतात. निर्धारित वेळेत वास्तव जगातील गुंतागुंतीच्या संगणकीय समस्या सोडविण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर असते.

 

दरवर्षी १११ देशांतील ३ हजारांहून अधिक विद्यापीठांमधील ५० हजारांहून अधिक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतात. स्पर्धेची अंतिम फेरी असलेली ICPC वर्ल्ड फायनल्स ही संगणक प्रोग्रामिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. २०२५मध्ये जगभरातील ६३ हजार २९४ विद्यार्थ्यांपैकी केवळ १४० संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते.

 

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घराजवळ संधी

आतापर्यंत महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांतील विद्यार्थ्यांना ICPCच्या ऑनसाइट फेरीत सहभागी होण्यासाठी दूरच्या शहरांमध्ये प्रवास करावा लागत होता. पुण्यात केंद्र उपलब्ध झाल्यामुळे या परिसरातील पात्र विद्यार्थ्यांना लांबचा प्रवास आणि त्यावरील खर्च टाळून स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

 

यामुळे आतापर्यंत प्रवास आणि इतर कारणांमुळे स्पर्धेत सहभागी न झालेल्या अनेक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. पुण्यातील केंद्रामुळे महाराष्ट्र आणि पश्चिम भारतात स्पर्धात्मक प्रोग्रामिंग तसेच कोडिंग संस्कृतीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

 

कोडिंग संस्कृतीला चालना मिळेल’

“ICPC ऑनसाइट स्पर्धेचे आयोजन केल्याने पुण्याच्या तंत्रज्ञान परिसंस्थेला समस्या निराकरण, सांघिक कार्य आणि शैक्षणिक उत्कृष्टतेच्या जागतिक व्यासपीठाशी जोडण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांतील विद्यार्थ्यांना देशभर प्रवास न करता जागतिक दर्जाच्या व्यासपीठावर स्पर्धा करता येईल. अधिकाधिक महाविद्यालयांनी कोडिंग संघ तयार करून स्पर्धात्मक प्रोग्रामिंग गांभीर्याने हाती घ्यावे, यासाठी हा निर्णायक टप्पा ठरेल,” असे IIIT पुणेचे संचालक प्रा. विनीत कंसल यांनी सांगितले.

 

ICPC कानपूर प्रादेशिक स्पर्धेचे संचालक डॉ. नागेंद्र कुशवाहा यांनीही पुण्यात केंद्र सुरू झाल्यामुळे महाराष्ट्र आणि पश्चिम भारतातील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली. या भागात स्पर्धात्मक प्रोग्रामिंगची संस्कृती रुजण्यास या उपक्रमामुळे मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

 

तीन विद्यार्थी आणि एक प्रशिक्षक

एकाच महाविद्यालयातील तीन विद्यार्थी आणि एक प्रशिक्षक अशा संघाला स्पर्धेसाठी नोंदणी करता येणार आहे. इच्छुक संघांना ३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या ऑनलाइन पात्रता फेरीत सहभागी व्हावे लागेल. कामगिरीच्या आधारे निवडलेल्या संघांना पुणे, कानपूर किंवा गांधीनगर येथील ऑनसाइट स्पर्धेसाठी आमंत्रित केले जाईल.

 

पात्रता फेरीसाठी नोंदणी ६ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत करता येणार आहे. स्पर्धात्मक प्रोग्रामिंगमध्ये तरुणींचा सहभाग वाढविण्यासाठी ऑनसाइट फेरीतील पाच जागा विशेषतः महिला संघांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

 

सविस्तर माहितीसाठी kanpur.indiaicpc.in या संकेतस्थळाला भेट देता येईल.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Local ad 1