पुणे : पुणे महानगरपालिका हद्दीतील प्रस्तावित वृक्ष गणना (ट्री सेन्सस) प्रकल्पाला स्थायी समितीने सध्या स्थगिती दिली आहे. सुमारे ३५ कोटी रुपये खर्चाच्या उद्यान विभागाच्या प्रस्तावावर समितीने ‘रेड सिग्नल’ दाखविल्याने या प्रकल्पाबाबत महापालिका प्रशासन पुढे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार महानगरपालिका क्षेत्रातील सर्व वृक्षांची गणना करणे बंधनकारक आहे. यापूर्वीही शहरात वृक्ष गणना करण्यात आली होती. मात्र पुन्हा एकदा गणना करण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली होती.
या कामासाठी चार कंपन्यांनी निविदा सादर केली होती. त्यापैकी तीन कंपन्या पात्र ठरल्या. त्यामध्ये मे. सार आयटी रिसोर्सेस प्रा. लि. या कंपनीची निविदा ०.७ टक्के कमी दरासह योग्य ठरली. या कंपनीने २९ कोटी ८७ लाख ४० हजार रुपये खर्चात हे काम करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र या कंपनीच्या पूर्वीच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. २०१६–१७ मध्ये महापालिकेने कर निर्धारण नसलेल्या मालमत्तांचा शोध घेणे व कर लावण्याचे काम या कंपनीला दिले होते. त्या वेळी कामातील त्रुटींमुळे २८ कोटी रुपयांच्या बिलापैकी केवळ १७ ते १८ कोटी रुपयेच कंपनीला देण्यात आले होते. कंपनीची ठेव रक्कमही अद्याप महापालिकेने परत केलेली नाही. तरीही त्या वेळी कंपनीवर विशेष कारवाई झालेली नव्हती.
२०१३ मध्ये पुणे शहरातील वृक्ष गणनाही याच कंपनीने केली होती. त्या अहवालानुसार शहरात सुमारे ५७ लाख वृक्ष असल्याची नोंद होती. त्यामध्ये सुमारे तीन हजार प्राचीन व विशेष महत्त्वाचे वृक्ष असल्याचेही नमूद करण्यात आले होते. मात्र गेल्या १२ ते १३ वर्षांत शहरात किती वृक्ष शिल्लक आहेत आणि किती वृक्ष तोडण्यास परवानगी देण्यात आली, याची स्पष्ट माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही. नव्या निविदेमध्ये २०१३ नंतर महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ३२ गावांचाही समावेश करण्यात आला आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार संपूर्ण शहरात सुमारे १ कोटी १० लाख वृक्ष असू शकतात. याच आधारावर सुमारे ३० कोटी रुपयांचा खर्चाचा अंदाज** तयार करण्यात आला आहे.
याशिवाय महापालिकेच्या अखत्यारीतील २१० उद्यानांमधील वृक्षांची गणना देखील या प्रकल्पात समाविष्ट करण्यात आली होती. तसेच वेब व मोबाईल अॅप्लिकेशन आणि आवश्यक हार्डवेअर यासाठी सुमारे ३५ लाख रुपये देण्याचाही प्रस्ताव होता. मात्र या प्रस्तावावर स्थायी समितीच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले की, या कामासाठी सध्या निधी उपलब्ध करून देण्यात येणार नाही. समितीच्या सदस्यांचे मत आहे की, इतकी मोठी रक्कम खर्च करण्याची गरज नाही. महापालिकेच्या उद्यान विभागातील कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि खासगी संघटनांच्या मदतीने कमी खर्चातही वृक्ष गणना करता येऊ शकते.

