Why Not Pune । पुण्यात नव्या गुंतवणुकीसाठी सरकारचा पुढाकार ; २५ हून अधिक GCC प्रमुखांशी मुख्यमंत्र्यांचा थेट संवाद
पुण्यातील ग्लोबल कॅपिबिलिटी सेंटरच्या विस्तारासाठी राज्य सरकार आणि महापालिकेची पुढाकाराची भूमिका
Why Not Pune । पुणे : पुण्यातील ग्लोबल कॅपिबिलिटी सेंटर (GCC) क्षेत्राचा विस्तार आणि शहरात नव्या गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकार आणि पुणे महापालिकेने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रात प्रथमच २५ हून अधिक ग्लोबल कॅपिबिलिटी सेंटरच्या प्रमुखांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन माध्यमातून या बैठकीत सहभागी होत विविध कंपन्यांच्या प्रमुखांशी थेट संवाद साधला. यावेळी पुण्यातील गुंतवणुकीच्या संधी तसेच उद्योगांसमोरील अडचणींबाबत चर्चा करण्यात आली.
उद्योग क्षेत्राला येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य सरकार आणि पुणे महापालिका आवश्यक ते सहकार्य करेल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. त्यामुळे पायाभूत सुविधा, स्थानिक प्रशासनाशी संबंधित बाबी आणि गुंतवणुकीसाठी आवश्यक असलेल्या इतर सुविधांबाबत सरकार आणि उद्योग क्षेत्रामध्ये थेट संवादाचे व्यासपीठ तयार झाले आहे.
ही बैठक आयोजित करण्यासाठी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि सभागृह नेते गणेश बिडकर यांनी पुढाकार घेतला. राज्य सरकार, महापालिका आणि उद्योग क्षेत्रातील प्रमुख एकाच व्यासपीठावर आल्याने पुण्यातील GCC क्षेत्राच्या भविष्यातील विस्ताराबाबत चर्चा करण्याची संधी मिळाली.
माहिती-तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, संशोधन व विकास आणि जागतिक व्यावसायिक सेवांच्या क्षेत्रात पुण्याची क्षमता मोठी आहे. कुशल मनुष्यबळ, शिक्षण संस्था आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील पायाभूत सुविधांमुळे पुणे जागतिक कंपन्यांसाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित झाले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यमान GCCच्या विस्तारासोबतच नवीन कंपन्यांना पुण्यात आणण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची ठरली.
सभागृह नेते गणेश बिडकर म्हणाले, “पुण्यातील ग्लोबल कॅपिबिलिटी सेंटरने आतापर्यंत जवळपास एक लाख रोजगार निर्माण केले आहेत. या क्षेत्राचा भविष्यात आणखी विस्तार व्हावा आणि पुण्यात मोठ्या प्रमाणावर नवीन गुंतवणूक यावी, यासाठी GCC प्रमुखांशी थेट संवाद साधणे गरजेचे होते. त्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली.”
“मुख्यमंत्र्यांनी उद्योगांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्य सरकार आणि पुणे महापालिका पूर्ण सहकार्य करेल, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. ‘पुणे का नाही?’ या विचारातून पुण्याला जागतिक कंपन्यांसाठी अधिक सक्षम गुंतवणूक केंद्र बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या संवादामुळे पुण्यातील नवीन गुंतवणुकीसाठी सकारात्मक वातावरण तयार होण्यास मदत होईल,” असेही बिडकर यांनी सांगितले.

