सर्व्हिस रस्ता रखडला, पार्किंग बेशिस्त; नवले-भूमकर चौकात कोंडी
प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम ; कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा इशारा
पुणे : नवले चौक ते भूमकर चौकादरम्यान महामार्गालगतच्या सर्व्हिस रस्त्यांची दुरवस्था, अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग आणि वाढती वाहतूक कोंडी यावरून प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. या कालावधीत कामांना सुरुवात न झाल्यास नवले पूल किंवा वीर बाजी पासलकर चौक येथे उपोषण करण्याचा इशारा नगरसेवक हरिदास चरवड यांनी दिला. (navale bhumkar chowk traffic congestion 15 days ultimatum)
रस्ता रुंदीकरणाच्या जागेवर बांधकाम? आधी घ्या भूसंपादन विभागाची एनओसी
या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी एनएचएआय, पुणे महापालिका आणि रिलायन्सच्या अधिकाऱ्यांसमवेत परिसराची पाहणी करण्यात आली. यावेळी एनएचएआयचे तांत्रिक व्यवस्थापक अंकित यादव, अभियंता कुलकर्णी, सुभाष घंटे, रिलायन्सचे राकेश कोळी तसेच एनएचएआयचे सल्लागार अनंत कुलकर्णी उपस्थित होते.
सर्व्हिस रस्ता थेट महामार्गाला जोडण्याची मागणी
नऱ्हे स्मशानभूमीजवळ सुरू असलेला सर्व्हिस रस्ता महामार्गाला जोडण्यासह दुसऱ्या बाजूचा समांतर सर्व्हिस रस्ता भूमकर चौकापर्यंत नेण्याची मागणी करण्यात आली. आवश्यक ठिकाणी संरक्षक भिंत आणि बाहेर पडण्यासाठी मार्ग (एक्झिट) उभारण्याचे निर्देश देण्यात आले. या कामाचे तातडीने नियोजन करण्यास अधिकाऱ्यांनी संबंधित सल्लागारांना सांगितले. भूमकर चौकातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी प्रस्तावित अंडरपासच्या कामालाही गती देण्याची मागणी करण्यात आली. सुमारे १५ मीटर रुंदीच्या अंडरपासची तांत्रिक तपासणी करण्यात आली असून, भविष्यातील वाढता वाहतूक भार लक्षात घेऊन अतिरिक्त अंडरपास किंवा लेनची शक्यता तपासण्याची मागणी करण्यात आली.
HCMTR प्रकल्पाला गती ; नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दोन पॅकेजच्या निविदा
नवले चौकातील अतिक्रमणे हटविण्याची मागणी
नवले चौकातील अतिक्रमणे हटवून रस्त्याची आवश्यक रुंदी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. आशीर्वाद हॉटेलजवळ वाहतुकीला अडथळा ठरणारा अनावश्यक पावसाळी नाला हटवून रस्ता रुंद करण्याच्या मागणीवर १५ दिवसांत कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले. विश्वास हॉटेल चौकातील वाढत्या वाहतूक कोंडीवर पुढील गुरुवारपर्यंत नव्याने वाहतूक नियोजन तयार करून प्रत्यक्ष पाहणीअंती निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले. वीर बाजी पासलकर चौकात पुलाखालील मार्गाची रुंदी वाढवून अवजड वाहनांची वाहतूक सुरळीत करण्याची मागणीही करण्यात आली.
रस्त्यावरच पार्किंग; वाहतुकीला अडथळा
वडगाव बुद्रुक स्मशानभूमीसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. महामार्गालगत रस्त्यावर अनधिकृतपणे उभी केली जाणारी लक्झरी तसेच प्रवासी वाहने यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. प्रवासी वाहनांसाठी स्वतंत्र आणि नियोजित पार्किंगची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

