France Flying Festival 2026। फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी ; मंगेश दिघेंचे अनोखे पॅराग्लायडिंग
कुपे कार २०२६ फ्लाइंग फेस्टिव्हलमध्ये धोतर-झब्बा आणि फेट्यातून महाराष्ट्राची संस्कृती जगासमोर
France Flying Festival 2026। पुणे, दि. २० : फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची पारंपरिक वेशभूषा आणि महाराष्ट्राची संस्कृती झळकली. पुण्याचे पॅराग्लायडिंग पायलट तसेच पुणे महापालिकेचे माजी पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनी फ्रान्समधील कुपे कार २०२६ आंतरराष्ट्रीय फ्लाइंग फेस्टिव्हलमध्ये धोतर, झब्बा आणि मराठी फेटा परिधान करून पॅराग्लायडिंगचे उड्डाण केले. या अनोख्या उड्डाणातून त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर महाराष्ट्राची वेगळी ओळख पोहोचवली.
फ्रान्समधील ग्रेनोबल शहराजवळील सेंट हिलारे डोंगरावर १९७९ पासून दरवर्षी सप्टेंबरमध्ये या फ्लाइंग फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. यंदाच्या ५३ व्या महोत्सवात जगभरातील विविध देशांतील पायलट सहभागी झाले आहेत. हजारो फ्रेंच नागरिक तसेच विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित असताना दिघे यांनी आल्प्स पर्वतरांगांवरून मराठी शेतकऱ्याच्या वेशात पॅराग्लायडिंग केले. त्यांच्या या आगळ्या उड्डाणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
हेल्मेटवर फेटा, अंगावर पारंपरिक वेश
दिघे यांनी उड्डाणासाठी धोतर, झब्बा आणि डोक्यावर मराठी फेटा परिधान केला होता. पॅराग्लायडिंगच्या तांत्रिक बाबी किंवा सुरक्षाव्यवस्थेत कोणताही बदल न करता ही वेशभूषा करण्यात आली. हार्नेसच्या आत आणि बाहेर केलेली पारंपरिक वेशभूषा तसेच हेल्मेटवर बांधलेला मराठी फेटा यामुळे त्यांचे उड्डाण विशेष ठरले. या महोत्सवात विमानांचे एरोबॅटिक्स, हेलिकॉप्टर, गायरोकोप्टर, हँग ग्लायडर, पॅराग्लायडर, पॅरामोटर, एरोमॉडेलिंग आणि हॉट एअर बलूनची प्रात्यक्षिके सादर केली जातात.पर्यावरण क्षेत्रात काम केल्यानंतर साहसी क्रीडा क्षेत्रातही सक्रिय असलेल्या मंगेश दिघे यांच्या या उपक्रमातून मराठी संस्कृतीची ओळख आल्प्सच्या आकाशात पोहोचली. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

