फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी ओंकार कामठे
20 विरुद्ध 8 मतांनी राष्ट्रवादीचा झेंडा; प्रथमच झालेल्या निवडणुकीत ऐतिहासिक यश
फुरसुंगी (पुणे) : फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे ॲड. ओंकार मच्छिंद्र कामठे यांची 20 विरुद्ध 8 मतांनी निवड झाली. गुरुवारी (ता. 15) नगराध्यक्ष संतोष फकीरा सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी निवडणूक सहायक म्हणून काम पाहिले. उपनगराध्यक्ष पदासाठी गुरुवारी सकाळी नगराध्यक्ष संतोष सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. ओंकार कामठे आणि शिवसेनेच्या नगरसेविका राणी बाळासाहेब हरपळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. विहित कालावधीत झालेल्या छाननीत दोन्ही अर्ज वैध ठरले. कोणतीही माघार न घेतल्याने प्रत्यक्ष मतदान निश्चित झाले. (fursungi uruli devachi upnagaradhyaksh omkar kamthe ncp victory)
या निवडणुकीत भाजपचे पाच नगरसेवक गैरहजर राहिले. मतदानात नगरसेवकांची 19 मते आणि नगराध्यक्षांचे एक मत अशी एकूण 20 मते ॲड. ओंकार कामठे यांना मिळाली, तर राणी हरपळे यांना 8 मते मिळाली. ॲड. कामठे यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा नगराध्यक्ष संतोष सरोदे यांनी केली. निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.
दरम्यान, प्रथमच झालेल्या फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने नगराध्यक्ष पदासह 32 पैकी 19 जागा जिंकत नगरपरिषदेवर आपला झेंडा फडकावला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल प्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कमी वयात पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या ॲड. ओंकार मच्छिंद्र कामठे यांच्या उपनगराध्यक्षपदी निवडीमुळे फुरसुंगी–उरुळी देवाचीच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय सुरू झाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

