पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर !
नागपूरमधील नाराजी दूर केल्यानंतर पुणे विभागावर लक्ष; स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला बळ देण्याची रणनीती
पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघातील पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी झालेल्या चर्चांनंतर आता भाजपने पुणे विभागातील निवडणुकीच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे दोन्ही मतदारसंघांतील प्रचाराला वेग मिळण्याची शक्यता आहे.
पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे सूक्ष्म नियोजन; रवींद्र चव्हाण पश्चिम महाराष्ट्रात ठाण मांडून
पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे हे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी भाजपने संघटनात्मक पातळीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी पुणे शहर, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठका घेऊन निवडणूक तयारीचा आढावा घेतला आहे.
सहा जिल्ह्यांत प्रचाराचे नियोजन
पदवीधर आणि शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मतदार नोंदणी, वैयक्तिक संपर्क, स्थानिक प्रश्नांची मांडणी आणि विधानसभा मतदारसंघनिहाय समन्वय यावर भाजपचा भर आहे. पश्चिम महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघांसाठी पक्षाने प्रभारी नियुक्त केले असून, प्रचार यंत्रणा अधिक सक्रिय करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
डॉ. स्मिता जाधव यांच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी विश्वास व्यक्त केला होता. “मला निश्चित विश्वास आहे की, त्यांना लोकं निवडून देतील,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. तसेच कौस्तुभ गावडे यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचाही त्यांनी उल्लेख केला होता.
शिक्षण क्षेत्रातील कामांचा प्रचारावर भर
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही शिक्षक आणि पदवीधर मतदारांपर्यंत सरकारच्या कामगिरीची माहिती पोहोचवण्यावर भर दिला आहे. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा-महायुतीचे सरकार अनेक योजना व उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध आहे. हे शिक्षक व पदवीधर मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सांगण्यात येत आहे,” असे चव्हाण यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात निवडणूक नियोजनाचा आढावा, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमधील समन्वय तसेच दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराला गती देण्यावर भर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे विभागातील निवडणुकीसाठी भाजपची पुढील रणनीती काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

