Pune Street Lights। पुण्यात पथदिव्यांच्या खांबांसाठी निधीचा ठणठणाट; १६,६०३ खांबांची गरज, निधी केवळ ४,७०० साठी
महापालिकेच्या जुन्या हद्दीतील अनेक पथदिवे व विजेचे खांब जुने झाले असून, ते खराब झाल्याने बदलण्याची गरज आहे. त्याचबरोबर महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये तसेच शहराच्या विस्तारलेल्या भागांत पुरेशी प्रकाश व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
महापालिकेच्या विद्युत विभागाच्या अहवालानुसार, शहरात सध्या १ लाख ८३ हजार ६८ विजेचे खांब असून, त्यावर २ लाख १० हजार ९८ पथदिवे व संबंधित उपकरणे बसविण्यात आली आहेत. मात्र, शहराचा विस्तार आणि नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमुळे पथदिव्यांची मागणी वाढली आहे.
विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा शेकटकर म्हणाल्या, ‘‘सध्या ४ हजार ७०० पथदिवे बसवण्यासाठी निधी उपलब्ध आहे. महापालिकेच्या हद्दीत १ लाख ८३ हजार ६८ विजेचे खांब असून, त्यावर २ लाख १० हजार ९८ पथदिवे, संबंधित उपकरणे बसवलेली आहेत. मात्र, नव्याने विकसित झालेल्या भागांचा विस्तार आणि गावांचा समावेश झाल्यामुळे पथदिव्यांची मागणी लक्षणीय वाढली आहे. महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने २०२६-२७ या वर्षात उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतुदींमधून अंदाजे ७,०२५ नवीन विजेचे खांब बसवण्याची योजना आखली आहे. यामध्ये जुने आणि जीर्ण झालेले खांब बदलणे, पडीक भागांमध्ये खांब बसवणे आणि रस्तारुंदीकरण प्रकल्पांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, अंदाजे ६,९९५ नवीन पथदिव्यांची उपकरणे बसवण्याचे नियोजन आहे.’’
८ हजारांहून अधिक खांब जीर्ण
विद्युत विभागाने तयार केलेल्या अहवालानुसार, शहरातील ८ हजार ९२ विजेचे खांब खराब किंवा जीर्ण अवस्थेत आहेत. तर पडीक भाग, रस्तारुंदीकरण प्रकल्प, नियोजित रस्ते आणि नवीन प्रकाश व्यवस्था आवश्यक असलेल्या ठिकाणी ८ हजार ५११ नवीन खांबांची गरज आहे. त्यामुळे खराब खांब बदलणे आणि नवीन खांब उभारणे मिळून एकूण १६ हजार ६०३ खांबांची आवश्यकता आहे. मात्र, या खांबांसाठी सध्या स्वतंत्र निधीची तरतूद नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. आवश्यक निधी उपलब्ध झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
एलईडीसाठी ₹२१.२५ कोटी, खांबांसाठी निधीचा प्रश्न
महापालिकेच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात एलईडी पथदिवे खरेदीसाठी ₹२१.२५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून शहरातील जुने दिवे बदलून अंदाजे ३० हजार पथदिवे खरेदी करण्याचे नियोजन आहे. मात्र, हे दिवे बसविण्यासाठी आवश्यक असलेल्या नवीन खांबांसाठी पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील दुर्गम आणि धोकादायक भागांमध्ये प्रकाश व्यवस्था निर्माण करण्यासाठी सुमारे १६ हजार खांब बसविण्याची योजना आहे. त्यापैकी ४ हजार ७०० खांबांसाठी निधी उपलब्ध झाला असून, उर्वरित खांब प्रादेशिक कार्यालयांकडून उपलब्ध होणाऱ्या निधीतून बसविले जाणार आहेत.

