Drishti IAS Pune Centre : दृष्टी आयएएसचे पुण्यात पहिले केंद्र; यूपीएससी इंग्रजीत, एमपीएससीसाठी मराठी वर्ग लवकरच
Drishti IAS Pune Centre : पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दृष्टी आयएएसने पुण्यात आपले पहिले केंद्र सुरू केले आहे. शिवाजीनगरमधील घोले रोडवरील पूनम आयकॉन येथे हे केंद्र सुरू करण्यात आले असून, पुण्यासह राज्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, मेंटॉरशिप आणि अभ्यास साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
केंद्राच्या उद्घाटनानिमित्त आयोजित खुल्या चर्चासत्राला ९०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. दृष्टी आयएएसचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक डॉ. विकास दिव्यकीर्ती यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षांची रचना, अभ्यासाचे नियोजन, ध्येय निश्चिती तसेच सातत्य आणि संयम याबाबत मार्गदर्शन केले.
पुण्यातच तयारीची संधी
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना दिल्लीला जावे लागू नये, या उद्देशाने पुण्यात केंद्र सुरू करण्यात आल्याचे दिव्यकीर्ती यांनी सांगितले. अनेक विद्यार्थ्यांना कुटुंबापासून दूर न जाता तयारी करायची असते. विशेषतः मुलींना शिक्षणासाठी दूरच्या शहरात पाठविण्याबाबत काही कुटुंबांना अडचणी येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना परिचित सामाजिक आणि कौटुंबिक वातावरणात राहून तयारी करता यावी, यासाठी पुण्याची निवड केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुण्यातील विद्यार्थ्यांना यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीला जाण्यासाठी मोठा प्रवास करावा लागत होता. आता हीच तयारी पुण्यात उपलब्ध होणार आहे.
यूपीएससी इंग्रजीत; एमपीएससीसाठी मराठी माध्यम
पुणे केंद्रात यूपीएससीचे वर्ग इंग्रजी माध्यमातून सुरू करण्यात येणार आहेत. तर एमपीएससीसाठी मराठी माध्यमातील वर्गही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिव्यकीर्ती यांनी दिली.
नोकरीसोबतही तयारीचा पर्याय
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अनेक वर्षे खर्च केल्यानंतर रोजगाराचे काय, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. त्यावर दिव्यकीर्ती यांनी किमान दोन वर्षे परीक्षेच्या तयारीवर केंद्रित प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर गरज भासल्यास नोकरी करतानाही अभ्यास सुरू ठेवता येतो. नोकरी मिळाल्यानंतर सार्वजनिक सेवेत जाण्याचे ध्येय सोडण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

