कोथरूडमध्ये ७ हजार झाडांसाठी मनपाचा पुढाकार ; ६,५०० वृक्षलागवड, ५०० झाडांचे पुनर्लागवड
जी. ए. कुलकर्णी पथ-कर्वे पुतळा रस्ता जोडणी प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर उपक्रम; सात हेक्टर जागेवर होणार हरितीकरण
पुणे : कोथरूडमधील प्रस्तावित जी. ए. कुलकर्णी पथ ते कर्वे पुतळा रस्ता जोडणी प्रकल्पामुळे होणारी पर्यावरणीय हानी भरून काढण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि आनंदवन फाउंडेशनने संयुक्तपणे मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड व पुनर्लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. सर्व्हे क्रमांक १८ मधील सुमारे सात हेक्टर जागेवर ६,५०० नवीन झाडे लावण्यात येणार असून, ५०० विद्यमान झाडांचे पुनर्लागवड करण्यात येणार आहे.
Mhada Pune Lottery। म्हाडाची ४,४६२ घरांची सोडत कधी? लाखभर अर्ज दाखल; वाचा संपूर्ण वेळापत्रक
या उपक्रमासाठी पुणे महापालिका आणि आनंदवन फाउंडेशन यांच्यात नुकताच संमती करार झाला. आनंदवन फाउंडेशनच्या देखरेखीखाली वृक्षलागवड आणि पुनर्लागवडीचे काम केले जाणार आहे. त्यानंतर झाडांची देखभाल व संवर्धनाची जबाबदारी महापालिकेची राहणार आहे.
रस्ता प्रकल्पामुळे काही झाडांवर परिणाम
कोथरूडमध्ये गेल्या काही वर्षांत झालेल्या पुनर्विकासामुळे लोकसंख्या आणि वाहनांची संख्या वाढली आहे. अंतर्गत रस्त्यांची मर्यादित क्षमता असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर जी. ए. कुलकर्णी पथ ते कर्वे पुतळा रस्ता जोडणी प्रकल्प राबविण्यात येत आहे.
या प्रकल्पामुळे काही झाडांवर परिणाम होणार असल्याने शक्य असलेल्या झाडांचे पुनर्लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर निश्चित केलेल्या सात हेक्टर जागेवर अतिरिक्त ६,५०० झाडे लावण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नवीन अंतर्गत मार्गामुळे कोथरूडमधील स्थानिक वाहतुकीला पर्यायी मार्ग उपलब्ध होऊन सध्या वापरात असलेल्या रस्ते आणि चौकांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. पायाभूत सुविधा विकसित करताना पर्यावरणीय जबाबदारीही जपणे आवश्यक असल्याने वृक्षलागवड आणि पुनर्लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.
आनंदवन फाउंडेशनचे संस्थापक सचिव भूपेश शर्मा यांनी सांगितले की, वृक्षलागवड व पुनर्लागवडीसाठी महापालिकेला जागा उपलब्ध करून देताना आनंद होत आहे. या उपक्रमामुळे पुण्याच्या हरित क्षेत्रात वाढ होण्यास मदत होईल. दीर्घकालीन देखभालीमुळे या वृक्षलागवडीचा अपेक्षित परिणाम दिसून येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

