पुणे : भोसरीतील रोशल गार्डनसमोरील मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या तीन खासगी ट्रॅव्हल बसला बुधवारी (३० सप्टेंबर) सायंकाळी अचानक आग लागली. या आगीत चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या दोन आणि पारसमणी ट्रॅव्हल्सची एक बस जळून खाक झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास रोशल गार्डनलगतच्या मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या एका बसला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने शेजारी उभ्या असलेल्या अन्य दोन बसनाही कवेत घेतले. त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन जवानांनी सुमारे तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. त्यामुळे परिसरातील इतर वाहनांना आग लागण्याचा धोका टळला.
भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोरील मैदान तसेच रोशल गार्डनलगतच्या मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात खासगी ट्रॅव्हल बस उभ्या केल्या जातात. त्यामुळे या ठिकाणी अग्निसुरक्षेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे. दरम्यान, बसला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

