भारत-इटली भागीदारीतून अत्याधुनिक ऑटोमोटिव्ह तंत्रज्ञानाला चालना

अभिजीत डायज आणि इटलीच्या आयएनईव्हीओचे ‘अभिनेवो टेक्नॉलॉजीज’ संयुक्त उपक्रम

पुणे : भारतातील अभिजीत डायज अँड टूल्स प्रा. लि. आणि इटलीतील आयएनईव्हीओ एस.आर.एल. यांनी ‘अभिनेवो टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड’ या संयुक्त उपक्रमाची औपचारिक स्थापना केली आहे. अत्याधुनिक मोल्ड्स, टूलिंग आणि उत्पादन तंत्रज्ञान विकसित करून त्याचे भारतात स्थानिकीकरण करणे, तसेच ऑटोमोबाईल आणि प्लास्टिक प्रक्रिया उद्योगांसाठी आधुनिक उत्पादन सुविधा उपलब्ध करून देणे, हा या भागीदारीचा प्रमुख उद्देश आहे. (india italy abhijeet diaz inevo abhinnevo technologies automotive technology)

 

या संयुक्त उपक्रमात अभिजीत डायजच्या टूलिंग, इंजिनीअरिंग आणि प्लास्टिक उत्पादन क्षेत्रातील चार दशकांहून अधिक अनुभवासोबत आयएनईव्हीओच्या उच्च अचूकतेच्या इंजेक्शन मोल्ड्स, मल्टी-मटेरियल तंत्रज्ञान आणि प्रगत पृष्ठभाग तंत्रज्ञानाचा मेळ घातला जाणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 2K आणि मल्टी-कॉम्पोनंट मोल्ड्स, इन-मोल्ड डेकोरेशन (IMD), इन-मोल्ड लेबलिंग (IML), इन-मोल्ड कोटिंग, प्रगत मोल्ड इंजिनीअरिंग आणि प्रक्रिया सिम्युलेशन यांसारख्या तंत्रज्ञानावर भर दिला जाणार आहे.

 

व्हिडीओ : भोसरीत तीन ट्रॅव्हल बस आगीत जळून खाक

 

 

अभिजीत डायज अँड टूल्सचे संचालक अभिजीत राऊत म्हणाले, “अत्याधुनिक तंत्रज्ञानाला संकल्पनेपासून औद्योगिकीकरणापर्यंत नेणे हा या भागीदारीचा प्रमुख उद्देश आहे. ग्राहकांना जलद विकास, जवळून इंजिनीअरिंग सहकार्य आणि जागतिक दर्जाची गुणवत्ता असलेली अत्याधुनिक टूलिंग सोल्यूशन्स उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

अभिजीत समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयामुरुगन थंगावेल यांनी सांगितले की, “आयएनईव्हीओच्या विशेष युरोपीय तंत्रज्ञानाची सांगड अभिजीतच्या इंजिनीअरिंग आणि उत्पादन क्षमतेसोबत घालून भारतात प्रगत उत्पादन क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे भारतीय तसेच जागतिक ग्राहकांसाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध होईल.”

 

 

आयएनईव्हीओचे व्यवस्थापकीय संचालक-विक्री रॉबर्टो फगाराझी यांनी भारतातील वाढत्या ऑटोमोबाईल उत्पादन क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाच्या स्थानिकीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. तंत्रज्ञान आणि गुणवत्तेशी तडजोड न करता अत्याधुनिक मोल्ड्स आणि उत्पादन तंत्रज्ञान भारताच्या जवळ आणण्याची ही महत्त्वपूर्ण संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

या भारत-इटली भागीदारीच्या प्रक्रियेत क्रिसेंडो वर्ल्डवाइडने महत्त्वाची भूमिका बजावली. २०२५ च्या सुरुवातीपासून क्रिसेंडोने अभिजीतसोबत संभाव्य आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान भागीदारांचा शोध, संपर्क, बैठका आणि व्यावसायिक संवादाचे समन्वयन केले. जून २०२५ मध्ये अभिजीत डायज आणि आयएनईव्हीओ यांच्यात झालेल्या सामंजस्य करारातही क्रिसेंडोने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर ही भागीदारी पुढे जात सप्टेंबर २०२६ मध्ये ‘अभिनेवो टेक्नॉलॉजीज’ या संयुक्त उपक्रमाच्या स्थापनेपर्यंत पोहोचली.

 

 क्रिसेंडो वर्ल्डवाइडच्या संचालक जल्पा जाधव आणि वरिष्ठ व्यवस्थापक मकरंद कोळेकर यांच्यासह संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. आयएनईव्हीओचे मुख्य कार्यकारी अधिकारी लुईगी कव्हर, रॉबर्टो फगाराझी, आयएनईव्हीओ जीएमबीएचचे व्यवस्थापकीय संचालक अँड्रियास पॉप, तसेच अभिजीत डायजचे संचालक निखिल राऊत आणि अभिजीत राऊत उपस्थित होते. इटालियन ट्रेड एजन्सीच्या नवी दिल्ली कार्यालयाच्या पालक सहानी यांनी ऑनलाइन माध्यमातून सहभाग घेतला.

 

अभिजीत डायजचे संचालक निखिल राऊत म्हणाले, “ही केवळ व्यावसायिक भागीदारी नसून दोन कंपन्यांची क्षमता, अनुभव आणि संस्कृती एकत्र आणणारे दीर्घकालीन सहकार्य आहे. ग्राहकांना मूल्य देणे आणि त्यांचा विश्वास कायम ठेवणे हे अभिनेवोच्या यशाचे महत्त्वाचे निकष असतील.” या संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी अत्याधुनिक टूलिंग, मोल्ड्स आणि उत्पादन तंत्रज्ञानाशी संबंधित सोल्यूशन्स विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे.

 

 

 

Local ad 1