आरोपींची धिंड काढणे पोलिसांना भोवले ; पाच अधिकाऱ्यांसह १७ पोलिसांवर गुन्हे
मानवाधिकार आयोगाच्या चौकशीनंतर सीआयडीकडून कारवाई
पुणे : आरोपींची सार्वजनिक ठिकाणी धिंड काढून त्यांना अपमानित केल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तत्कालीन वरिष्ठ निरीक्षकांसह पाच अधिकारी आणि १७ पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी यांच्या तक्रारीवरून बुधवारी (२३ सप्टेंबर) मध्यरात्री हे गुन्हे दाखल करण्यात आले. मानवाधिकार आयोगाच्या चौकशीनंतर तयार करण्यात आलेल्या ‘फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट’मधील निष्कर्षांच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. (pune bharati vidyapeeth police fir 17 policemen)
चार आरोपींना गुडघ्यावरून चालविल्याचा आरोप
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ५ जुलै २०२६ रोजी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपीसह चार आरोपी पोलीस ठाण्यात हजर झाले होते. दुपारी तीनच्या सुमारास हजर झाल्यानंतर त्यांना रात्री साडेदहाच्या सुमारास अटक करण्यात आली आणि न्यायालयात हजर करण्यात आले.
७ जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास या चारही आरोपींना लेक टाऊनजवळील एका वसाहतीत नेण्यात आले. तेथे त्यांना गुडघ्यावर बसून रस्त्यावर चालण्यास भाग पाडण्यात आल्याचा आरोप आहे. पोलिसांनी लाठी-काठ्यांनी त्यांच्या पायांवर मारहाण केल्याचे व्हिडीओ चित्रणात दिसून आल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच नागरिकांसमोर गुडघ्यावर बसवून हात जोडून माफी मागण्यास भाग पाडल्याचे ही तक्रारीत म्हटले आहे. व्हिडीओमध्ये दिसणारा अधिकारी तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील असल्याची ओळख पोलिस कर्मचाऱ्यांनी करून दिल्याचे सीआयडीच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलीस नोंदीत कारवाईचा उल्लेख नाही
या कारवाईदरम्यान आरोपींना संबंधित वसाहतीत नेल्याची नोंद पोलीस ठाण्याच्या जनरल डायरीमध्ये नसल्याचे ‘फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट’मध्ये नमूद आहे. तसेच पोलिसांच्या वाहनाच्या लॉगबुकमध्येही त्याची नोंद आढळली नसल्याचे अहवालात म्हटले आहे. मानवाधिकार आयोगासमोर जबाब नोंदविणाऱ्या काही पोलिस कर्मचाऱ्यांनी आपण घटनास्थळी उपस्थित असल्याचे मान्य केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. चारही आरोपींना पोलीस ठाण्यात तसेच वसाहतीच्या परिसरात लाठी-काठ्यांनी मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. आरोपींच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांमध्ये मारहाणीमुळे झालेल्या दुखापतींची नोंद नसल्याचे सीआयडीने नमूद केले आहे. मात्र, एका आरोपीच्या अंगझडती पंचनाम्यात उजव्या हाताच्या मधल्या बोटाला दुखापत झाल्याचे आढळले होते. संबंधित दुखापतीचा उल्लेख वैद्यकीय प्रमाणपत्रात नसल्याचेही तपासात समोर आले.
दुसऱ्या प्रकरणात तीन अल्पवयीनांची धिंड
दुसरे प्रकरण अल्पवयीन मुलाच्या खूनप्रकरणाशी संबंधित आहे. या प्रकरणात आठ अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांच्या वाहनाच्या बोनेटवर बसवून धिंड काढण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला होता. या प्रकरणात तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक निरीक्षक गणेश मोहिते, स्नेहल थोरात, उपनिरीक्षक निलेश राजेंद्र मोकाशी, पोलीस हवालदार सुनिल हनवते, पोलीस अंमलदार दिनेश टापके, मितेश चोरमोले, सागर बोरगे, सोहम शेंडकर, मंगेश पवार आणि महिला पोलीस अंमलदार सुवर्णा भिसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींवर कायद्यानुसार कारवाई करण्याऐवजी त्यांना सार्वजनिक ठिकाणी अपमानित करणे, मारहाण करणे आणि संबंधित कारवाईची अधिकृत नोंद न ठेवणे, या आरोपांची चौकशी करण्यात आली. मानवाधिकार आयोगाच्या चौकशीनंतर सीआयडीने केलेल्या तक्रारीवरून आता गुन्हे दाखल झाले आहेत.

