PPP Cancer Hospital Pune । पुण्यात देशातील पहिले PPP तत्त्वावरील कॅन्सर हॉस्पिटल

रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

 

– बाणेर येथे 150 बेडचे अत्याधुनिक ‘आपुलकी मेडिकल सेंटर’

– CGHS दरात कर्करोग व हृदयरोग उपचार उपलब्ध

 

PPP Cancer Hospital Pune। पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने बाणेर येथे उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावरील अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालयाचे लोकार्पण रविवारी (17 मे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी 12.30 वाजता हा उद्घाटन सोहळा पार पडणार असून, ही माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली. यावेळी नगरसेविका मयुरी कोकाटे, पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीना बोराडे, रुग्णालयातील डॉक्टर इत्यादी उपस्थित होते.

 

पुणे महापालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेले हे ‘आपुलकी मेडिकल सेंटर’ 150 बेडचे अत्याधुनिक कर्करोग व हृदयरोग उपचार केंद्र आहे. निदान, उपचार आणि पुनर्वसन या तिन्ही सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे हे केंद्र पुणेकरांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

 

उद्घाटन कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर, उपमहापौर, सभागृहनेते, विरोधी पक्षनेते, आयुक्त आणि विविध लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

 

भिमाले यांनी सांगितले की, ते सभागृहनेते असताना या रुग्णालयाचा प्रस्ताव सुरुवातीला सॅलिसबरी पार्क येथे मंजूर करण्यात आला होता. यासाठी त्यांच्या ‘स’ यादीतून 14.85 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र, जागेची उपलब्धता आणि व्यवहार्यता लक्षात घेऊन प्रकल्प बाणेर येथे स्थलांतरित करण्यात आला. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सहा वर्षांत हा प्रकल्प पूर्णत्वास गेला.

 

या रुग्णालयात कॅन्सर तपासणी, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, शस्त्रक्रिया, PET-CT स्कॅन, 3 Tesla MRI, 160-स्लाइस CT स्कॅन, जीनोम सिक्वेन्सिंग, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU/CCU, केमोथेरपी आणि न्यूक्लियर मेडिसिन विभाग उपलब्ध असतील. तसेच Linear Accelerator – TrueBeam आणि HyperArc सारखी अत्याधुनिक रेडिओथेरपी यंत्रणा बसविण्यात आली आहे. पुरुषांमधील मुख, अन्ननलिका, जठर, फुफ्फुस आणि प्रोस्टेट कर्करोग तसेच महिलांमधील स्तन व गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर विशेष उपचार सुविधा उपलब्ध असणार आहेत.

 

गरीब व गरजू रुग्णांसाठी या रुग्णालयात उपचार CGHS (Central Government Health Scheme) दरानुसार उपलब्ध होतील. तसेच सर्व शासकीय आरोग्य योजना आणि खासगी विमा सुविधा येथे स्वीकारल्या जाणार आहेत. त्यामुळे मुंबई किंवा इतर शहरांमध्ये उपचारासाठी जाण्याची गरज कमी होणार आहे. महापालिकेचे हे पहिले स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटल असून, पुण्यातील आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे. वाढत्या कॅन्सर रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचा विश्वास भिमाले यांनी व्यक्त केला.

 

 

Local ad 1