पुणे : कर्नाटक व तेलंगणा सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये लिंगायत समाजाची मोठी वस्ती असून राज्यभरात सुमारे दीड कोटी समाजबांधव असल्याचा अंदाज आहे. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत ‘हिंदू लिंगायत’ अशी स्वतंत्र नोंद व्हावी, यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी सांगितले.
वीरशैव लिंगायत संघाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजयी झालेल्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा गौरव सोहळा शिवाजीनगर मधील डेक्कन हर्डीकर रुग्णालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. कोरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. त्र्यंबक दापकेकर होते. राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे, भोकरचे नगराध्यक्ष भगवान दंडवे, सूर्यकांत विश्वासराव आदी उपस्थित होते.
डॉ. विनय कोरे यांनी सांगितले की, लिंगायत समाजाने एकजुटीने काम करण्याची गरज आहे. आर्थिक विकास महामंडळातील जाचक अटींमुळे समाजाला अपेक्षित लाभ मिळत नसल्याने त्या शिथिल करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. येत्या काही दिवसांत यावर सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकात संजय कोडगे यांनी समाजहितासाठी पक्षभेद विसरून काम करण्याचे आवाहन केले. लिंगायत समाजासाठीच्या आर्थिक विकास महामंडळाला अधिक निधी देण्याची गरज व्यक्त करत त्यांनी पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याची मागणी केली. तसेच प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहाची सोय व्हावी, असेही त्यांनी नमूद केले. अनेक गावांमध्ये लिंगायत समाजासाठी स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात विविध स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.
राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी सांगितले की, खासदार झाल्यानंतर त्यांनी मंगळवेढा परिसरात दौरा करून समाजाच्या प्रश्नांचा आढावा घेतला. लिंगायत समाजासाठी स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. नवी मुंबई येथे वसतिगृहासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून पिंपरी-चिंचवडमध्येही जागा शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुण्यातही वसतिगृह उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
तसेच, सोलापूर येथील अहिल्याबाई होळकर विद्यापीठातील महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राच्या धर्तीवर नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातही पुढील एका महिन्यात असेच केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळासाठी सध्या ५० कोटी रुपयांची तरतूद असून ती अपुरी आहे. ती किमान १,००० कोटी रुपयांपर्यंत वाढवावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

