हृदयनाथ मंगेशकर यांची मोठी घोषणा : नांदोशीत लताआशा मंगेशकर मेडिकल इन्स्टिट्यूट ; १६ एप्रिलला संकल्प सभा

 

पुणे : लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या विश्वस्त मंडळाने सिंहगड रस्त्यावरील नांदोशी येथे उभारण्यात येणाºया प्रस्तावित रुग्णालयाच्या प्रकल्पाचे नाव लता मंगेशकर इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस ऐवजी आता लताआशा मंगेशकर इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस असे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारतरत्न लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोन्ही दिग्गज भगिनींच्या कार्याला अभिवादन म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रमुख डॉ. धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

या प्रकल्पाला नवे नाव देत तसेच ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी येत्या १६ एप्रिल रोजी पूर्वनियोजित कोनशिला समारंभाऐवजी आता संकल्प आणि श्रद्धांजली सभा होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. मंगेशकर आणि भोसले कुटुंबीयांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे.

 

येत्या गुरुवारी (दि. १६) रोजी ही सभा सायंकाळी ५ वाजता नांदोशी येथील प्रकल्पस्थळी होणार आहे. त्यामध्ये रुग्णालय उभारणीचा संकल्प व्यक्त केला जाईल आणि आशाताईंना श्रद्धांजली अर्पण केली जाईल. कार्यक्रमानिमित्त दुपारी ४ वाजता संगीत सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विभावरी जोशी यांचे गायन होणार असून, त्यानंतर शंतनु गोखले (संतूर), अमर ओक (बासरी) आणि पांडुरंग पवार (तबला) यांचे वाद्यसंगीत सादर होणार आहे. संगीतविश्वातील दोन अजरामर दिग्गजांना मानवंदना देत आरोग्यसेवेच्या नव्या पर्वाचा संकल्प करणारा हा कार्यक्रम भावपूर्ण आणि प्रेरणादायी ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Local ad 1