पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष विषय समिती सभापतींच्या निवडीकडे लागले आहे. अध्यक्षपदी वीरधवळ जगदाळे (दौंड) आणि उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील (आंबेगाव) यांची निवड झाल्यानंतर प्रादेशिक समतोल साधण्यासाठी मुळशी आणि मावळ तालुक्याला प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सभापतीपदासाठी इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली असून, पौड गटाचे तरुण सदस्य आर्किटेक्ट मिलिंद वाळंज यांचे नाव सध्या चर्चेत आघाडीवर आहे. त्याचबरोबर संतोष राऊत, तुषार थोरात आणि अमोल नलावडे यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे.
जिल्हा परिषदेत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असल्याने बांधकाम, समाजकल्याण, महिला व बालकल्याण तसेच कृषी व पशुसंवर्धन या महत्त्वाच्या समित्यांच्या सभापतीपदासाठी चुरस वाढली आहे. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने या समित्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात.
अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांवर अनुभवी नेतृत्वाची निवड झाल्याने आता समित्यांमध्ये युवा नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिलिंद वाळंज हे आर्किटेक्चर पदवीधर असून बांधकाम क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान आणि नियोजनाचा अनुभव त्यांच्या जमेच्या बाजू मानल्या जात आहेत. वारकरी परंपरेचा वारसा आणि सुशिक्षित युवा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे.
त्यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील रस्ते आणि इमारतींच्या प्रलंबित कामांना गती मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच तरुण आणि कर्तबगार नेतृत्वाला संधी देण्याची भूमिका घेतली असून, त्याच धोरणाचा भाग म्हणून वाळंज यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता पक्षश्रेष्ठी कोणाला सभापतीपदाची जबाबदारी देतात, याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

