...

पुणेकरांसाठी मोठी खुशखबर ! हिंजवडी मेट्रो कधी धावणार ; काय म्हणाले पीएमआरडीएचे आयुक्त जाणून घ्या…

 

पुणे : पुणेकरांसाठी, विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणारी ‘मेट्रो लाईन ३’ आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या २३.२ किलोमीटर मार्गिकेवरील पहिल्या टप्प्याचे काम मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) प्रशासनाने निश्चित केले आहे.

 

 

पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरुवारी (दि. १९) प्रत्यक्ष ‘ऑन ग्राउंड’ पाहणी करत प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी माण ते शिवाजीनगर या मार्गावरील २३ स्थानकांची तपासणी करत कामाचा दर्जा, तांत्रिक अडचणी आणि सद्यस्थितीचा आढावा घेतला.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, हा प्रकल्प ‘मिशन मोड’वर राबवला जात असून, कामाचा वेग वाढवण्यावर भर दिला जात आहे. औंध येथील पीएमआरडीए कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाहणी करण्यात आली. यावेळी मुख्य अभियंता रिनाज पठाण आणि ‘पीआयटीसीएमआरएल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सैनी उपस्थित होते.

 

महानगर आयुक्तांनी कंत्राटदारांना स्पष्ट सूचना देत, “कामाचा वेग वाढवताना सुरक्षितता आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करू नका,” असे निर्देश दिले. पहिल्या टप्प्यात १२ स्थानके कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यासाठी कामाला गती देण्यावर भर देण्यात आला आहे.

 

सध्या या प्रकल्पाचे ९४.२० टक्के काम पूर्ण झाले असून, सिग्नलिंगची तांत्रिक चाचणी सुरू आहे. तसेच आरडीएसओ (RDSO) आणि सीएमआरएस (CMRS) तपासणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हिंजवडीतील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ही मेट्रो महत्त्वाची ठरणार आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर शिवाजीनगर ते हिंजवडी हा प्रवास अल्प वेळेत पूर्ण होणार असून, खासगी वाहनांवरील ताणही कमी होणार आहे.

 

 

“मे २०२६ पर्यंत १२ स्थानकांचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्यासाठी सर्व स्थानकांची प्रत्यक्ष पाहणी करून कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकल्पासाठी पीएमआरडीएकडून सर्व आवश्यक सहकार्य दिले जाईल.”

डॉ. अभिजित चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

 

 

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

* स्वरूप: सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावरील देशातील पहिली मेट्रो

* मार्गिका: हिंजवडी ते शिवाजीनगर (२३.२ किमी, उन्नत मार्ग)

* भागीदार: टाटा समूहाची TRIL आणि Siemens Project Ventures

* एकूण खर्च: ८,३१३ कोटी रुपये

Local ad 1