पुण्यातील क्रीडा संकुलांना कुलूप ! महापालिकेच्या लेखी उत्तरात धक्कादायक वास्तव उघड
नगरसेवक हरिदास चरवड यांनी विचारला होता प्रश्न
पुणे : शहरात क्रीडा सुविधांचा विस्तार करण्याचा उद्देश असताना, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे तब्बल 38 क्रीडा संकुले बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शहरातील एकूण 107 क्रीडा संकुलांपैकी सध्या केवळ 69 संकुलेच कार्यरत आहेत. महापालिकेच्या मार्च महिन्यातील सर्वसाधारण सभेत नगरसेवक हरीदास चरवड यांनी क्रीडा संकुलांच्या स्थितीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. प्रशासनाने दिलेल्या उत्तरानुसार, शहरात 29 क्रीडा मैदाने आणि 36 जलतरण तलावांसह एकूण 107 क्रीडा संकुले आहेत. मात्र, यापैकी मोठा हिस्सा सध्या बंद अवस्थेत आहे. (pune 38 sports complexes closed pmc rent policy issue)
Global Guruji Yojana। आता गुरुजीही होणार ग्लोबल ! पुणे जिल्हा परिषदेची भन्नाट योजना !
भाडे धोरणामुळे संकुले अडचणीत
क्रीडा संकुले बंद पडण्यामागे उच्च भाडे दर हे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेकडून रेडीरेकनरच्या दराने भाडे आकारले जाते. परंतु, संकुलांमधील सुविधा आणि त्यातून मिळणारे उत्पन्न यामध्ये मोठी तफावत असल्याने संचालकांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. याशिवाय, देखभाल, दुरुस्ती, वीज बिल आणि इतर खर्चाची जबाबदारीही संकुल चालकांवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांनी संकुले बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रस्ताव प्रलंबितच
या समस्येवर उपाय म्हणून क्रीडा विभागाने भाडे दरात सवलत देण्याचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, हा प्रस्ताव अद्याप प्रशासकीय पातळीवर मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे बंद संकुले पुन्हा सुरू होण्याचा प्रश्न अनुत्तरित आहे.
काही भागांमध्ये क्रीडा सुविधांचा अभाव
शहरातील काही भागांमध्ये क्रीडा सुविधांची कमतरता गंभीर स्वरूपात जाणवत आहे. औंध-बाणेर परिसरातील प्रभाग क्रमांक 8 आणि 9 मध्ये एकही क्रीडा मैदान उपलब्ध नाही. तसेच बिबवेवाडी क्षेत्रातही क्रीडा मैदाने नाहीत. विश्रामबागवाडा आणि कोथरूडमधील काही प्रभागांमध्येही क्रीडा संकुलांचा अभाव आहे. नव्याने महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांचा विकास आराखडा प्रलंबित असल्याने त्या भागात सुविधा उभारण्यास अडथळे येत आहेत.
तातडीने निर्णयाची गरज
शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत क्रीडा सुविधा अपुऱ्या ठरत आहेत. त्यामुळे बंद संकुले पुन्हा सुरू करणे आणि नवीन क्रीडा सुविधा उभारणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञ आणि नागरिकांचे मत आहे.

