MHADA Pune Lottery : घर लागलं नाही? काळजी नको ; MHADA पुण्याची नवी सोडत येतेय
मार्चमध्ये नवी जाहिरात, एप्रिल–मे मध्ये पुढील सोडत
MHADA Pune Lottery पुणे : म्हाडा पुणे मंडळाच्या ४,१८६ घरांसाठी मंगळवारी दुपारी सोडतीचा कार्यक्रम पार पडला. या सोडतीत तब्बल २.१५ लाखांहून अधिक अर्जदार सहभागी झाले होते. मात्र उपलब्ध घरांची संख्या कमी असल्याने २.१० लाखांहून अधिक अर्जदारांना अपयश आले आहे. मात्र अयशस्वी अर्जदारांनी निराश होण्याची गरज नसल्याचे म्हाडा पुणे मंडळाने स्पष्ट केले आहे. कारण पुण्यातील घरांसाठी लवकरच नवीन सोडत काढली जाणार आहे. मार्च महिन्यात यासाठी जाहिरात प्रसिद्ध होणार असून एप्रिल–मे दरम्यान पुढील सोडत काढली जाईल.
ही सोडत पुण्यातील जिल्हा परिषद भवनातील शरदचंद्र पवार सभागृहात दुपारी १२ वाजता पार पडली. पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते संगणकीय पद्धतीने सोडत काढण्यात आली. म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे हे मुंबईहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.
ही घरे २० टक्के सर्वसमावेशक योजना आणि १५ टक्के एकात्मिक योजना अंतर्गत उपलब्ध झाली होती. या घरांसाठी सप्टेंबर २०२५ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र तांत्रिक अडचणी, सोडतपूर्व प्रक्रियेला दिलेली मुदतवाढ आणि आचारसंहिता यामुळे सोडत लांबली होती. आगामी सोडतीत किती घरे असतील आणि कोणत्या परिसरातील असतील, याबाबत अद्याप माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच संपूर्ण तपशील जाहीर होणार असल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले.

