...

Pune NCP politics। पुण्यात अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक ! भाजपला भिडण्यासाठी निलेश निकम गटनेते

पुणे : पुणे महापालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसने महत्त्वाचा डाव टाकत पक्षाच्या गटनेतेपदी ॲड. निलेश निकम यांची नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला असून, सत्ताधारी भाजपला थेट राजकीय आव्हान देण्यासाठी अभ्यासू व अनुभवी नेतृत्व पुढे आणल्याचे मानले जात आहे. दरम्यान बाबुराव चांदेरे आणि निलेश निकम यांची गटनेतेपदासाठी नावे चर्चेत होती. आता चांदेरे यांना विरोधी पक्ष नेता म्हणून जबाबदारी दिली जाईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (pune politics nilesh nikam appointed ncp group leader ajit pawar strategy)

 

निलेश निकम हे पुणे महापालिकेत सलग पाचव्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेतील त्यांचा मोठा अनुभव आणि प्रशासकीय कामकाज वरची पकड ही त्यांची जमेची बाजू मानली जाते. यापूर्वी त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद यशस्वीरीत्या सांभाळले असून, अर्थकारण व विकासकामांच्या नियोजनात त्यांनी ठसा उमटवला होता

 

महापालिकेतील आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अधिक आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत या निवडीमधून मिळत आहेत. भाजपच्या सत्तेला विरोध करताना अभ्यासपूर्ण मुद्दे मांडणारे नेतृत्व पक्षाने पुढे केले असून, सभागृहातील चर्चांना धार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय जाणकारांच्या मते, अजित पवार यांनी पुण्यातील संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ता-समीकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अधिक प्रभावी होण्याची चिन्हे आहेत.

 

पुणे महानगरपालिकेच्या राजकारणात प्रदीर्घ अनुभव आणि ठोस कामगिरी असलेले ज्येष्ठ नेते निलेश निकम यांनी 1992 साली पहिल्यांदा नगरसेवक म्हणून महानगरपालिकेत प्रवेश केला. त्यानंतर 1992 ते 2012 या कालावधीत त्यांनी सलग 4 वेळा नगरसेवकपद भूषवून पुणे शहराच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे.

सन 2009-10 मध्ये स्थायी समिती अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी सर्वसामान्य, गरीब व गरजू घटकांसाठी महत्त्वपूर्ण ठरलेली “शहरी गरीब योजना” महानगरपालिकेत त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रभावीपणे राबवली. ही योजना आजही पुणे महानगरपालिकेमध्ये यशस्वीपणे सुरू असून, त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात पुणेकर नागरिक घेत आहेत, हे त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे उत्तम उदाहरण आहे.

 

तसेच 2010-11 मध्ये सभागृह नेता म्हणून त्यांनी महापालिकेच्या कामकाजात सुसूत्रता, शिस्त आणि लोकहिताचा दृष्टिकोन ठेवत प्रभावी भूमिका बजावली.

त्यानंतर तब्बल 14 वर्षांनंतर, 2026 मध्ये पुन्हा एकदा नगरसेवक होण्याचा मान निलेश निकम यांना मिळाला आहे. त्यांच्या अनुभव, कार्यक्षमता आणि नेतृत्वावर विश्वास ठेवत अजितदादांच्या सूचनेनुसार पुन्हा एकदा त्यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

निलेश निकम यांच्या या नियुक्तीमुळे पुणे महानगरपालिकेतील / सत्ताधारी गटाला सक्षम, अनुभवी आणि लोकाभिमुख नेतृत्व लाभले असून, पुणे शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी ते अधिक प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Local ad 1