पुणे, : नियमांचे उल्लंघन, परवानग्यांतील विसंगती आणि प्रशासनाच्या ढिसाळ समन्वयामुळे अखेर RMC/PSC प्लांट उद्योग आक्रमक झाला असून, परिस्थिती सुधारली नाही तर उत्पादन पूर्णपणे बंद करण्याचा कडक इशारा देण्यात आला आहे. उद्योगातील अनियमितता, पर्यावरणीय मुद्दे आणि अनुपालन तपासणीसाठी अनेक प्लांट्सनी तातडीने उत्पादन ‘ठप्प’ करण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. या संदर्भात पत्रकार परिषदेला विक्रम धूत, नरेंद्र महाजन, नरेंद्र पासलकर, चैतन्य रायसोनी आणि पुणे आरएमसी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर, प्रवृक्ते. सचिन काटे उपस्थित होते. (pune rmc industry pause single window policy demand)
उद्योग प्रतिनिधींनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, विविध विभागांकडून वेगवेगळे आणि अनेकदा परस्परविरोधी नियम लादले जात आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका, स्थानिक प्रशासन, पोलिस आणि वाहतूक विभाग यांच्या कारवाईमुळे उद्योग चालवणे कठीण झाले आहे. “एकाच उद्योगासाठी पाच-पाच विभागांची दारं ठोठावावी लागतात. वेळ, पैसा आणि मनुष्यबळ यांचा अपव्यय होतो, तरीही अंतिम मंजुरी मिळत नाही,” अशी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
उद्योगावर होत असलेल्या कारवाईबाबत संताप व्यक्त करताना, “नियमांचे पालन करणाऱ्या प्लांट्सनाही नोटिसा देऊन त्रास दिला जात आहे. यामुळे उद्योगात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा छळ त्वरित थांबवला नाही, तर उत्पादन पूर्णपणे बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही,” असा इशारा देण्यात आला.
पर्यावरणीय मुद्द्यांवर बोलताना उद्योग प्रतिनिधींनी दावा केला की, PSC प्लांटमधील उत्पादन प्रक्रिया ही बंदिस्त आणि यांत्रिक असल्याने प्रदूषणाचा परिणाम अत्यल्प असतो. पारंपरिक बांधकाम पद्धतींच्या तुलनेत धूळ व घातक उत्सर्जन कमी होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तरीदेखील, सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी उद्योग स्वतःहून स्वमूल्यमापन करत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
वाहतूक व्यवस्थेतील अडचणींकडे लक्ष वेधताना, अवजड वाहनांवरील निर्बंध, अरुंद रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे उत्पादन आणि वितरणावर मोठा परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले. “अपघातांचे खापर फक्त उद्योगावर फोडणे चुकीचे आहे. यामागे पायाभूत सुविधांचा अभाव आणि नियोजनातील त्रुटी जबाबदार आहेत,” असेही नमूद करण्यात आले.
गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस निर्णय होत नसल्याने उद्योगाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. परिस्थितीमध्ये तातडीने सुधारणा न झाल्यास PSC प्लांटमधील उत्पादन अनिश्चित काळासाठी पूर्णपणे बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
“आमचा उद्देश संघर्ष नाही, पण अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने तातडीने एकसंध आणि पारदर्शक धोरण जाहीर करून ‘सिंगल विंडो’ प्रणाली लागू केली नाही, तर उद्योग बंद पडण्याची वेळ येईल,” असा इशाराही उद्योग प्रतिनिधींनी दिला.

