...

महापालिका निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावरच यश – केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशाबाबत बोलताना केंद्रीय सहकार व नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, निवडणुकीदरम्यान विरोधकांनी वैयक्तिक टीका करत नकारात्मक राजकारण केले. मात्र, भाजपने केवळ विकासाच्या मुद्द्यांवरच प्रचार केला. मोहोळ म्हणाले, “मतदार शहराचे भविष्य, विकासाची दिशा आणि कामाची गुणवत्ता पाहूनच मतदान करतो. आरोप-प्रत्यारोपांशी त्याला काहीही देणेघेणे नसते. त्यामुळेच पुणेकरांनी महापालिकेत भाजपवर विश्वास दाखवला.” ते पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने आयोजित वार्तालापात बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील आणि सरचिटणीस मंगेश फल्ले उपस्थित होते. (vikasachya muddyavar nivadnuk yash murlidhar mohol)

महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शहरात सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांचे अभिनंदन करणारे मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावण्यात आले आहेत. मात्र, निवडणुकीदरम्यान भाजपने आपल्या जाहीरनाम्यात पुणे शहर फ्लेक्स व अतिक्रमणमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. पक्षाचे महासचिव राजेश पांडे यांनीही पुणे फ्लेक्समुक्त केले जाईल, अशी घोषणा केली होती. तरीही कार्यकर्त्यांकडून अनधिकृत फ्लेक्स लावले जात असल्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला असता, मोहोळ म्हणाले की, या संदर्भात महापालिका आयुक्तांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, लवकरच फ्लेक्स हटवण्याची कारवाई केली जाईल.

murlidhar mohol

सहकार आणि हवाई वाहतुकीवर भर

मोहोळ यांनी केंद्र सरकारने सहकार मंत्रालय स्थापन करून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अनेक महत्त्वाचे बदल केल्याचे सांगितले. गेल्या दीड वर्षात सहकार क्षेत्रात काम करताना राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना १० हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तसेच, राज्यात हवाई वाहतुकीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. लोहगाव विमानतळाचा विस्तार करून प्रवाशांसाठी सुविधा वाढवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात सध्या १४ विमानतळ असून, देशात सर्वाधिक विमानतळ असलेले राज्य महाराष्ट्र आहे. देशांतर्गत हवाई वाहतुकीत महाराष्ट्र दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर आहे. पुणे विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ३०० एकर जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

पदे क्षेत्र पाहून देणार नाही

महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांच्या विकासासाठी तेथील नगरसेवकांना विषय समित्यांमध्ये स्थान देण्याबाबत विचारले असता, मोहोळ म्हणाले, “एखाद्या भागातील प्रतिनिधीला पद दिल्यानेच त्या भागाचा विकास होतो, असे नाही. सर्वांगिण विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून काम केले जाईल, त्यामुळे समाविष्ट गावांचाही विकास होईल.” महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत कोणतीही युती नसल्यामुळे त्यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, स्वीकृत नगरसेवक पदे देताना ज्यांना आतापर्यंत संधी मिळालेली नाही, त्यांचा विचार होऊ शकतो. याबाबत अंतिम निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व घेईल, असेही ते म्हणाले.

२४ तास पाणी नाही, समान जलपुरवठा

पुण्यात २४ तास पाणी पुरवठ्याच्या आश्वासनाबाबत विचारले असता, मोहोळ म्हणाले, “२४ तास पाणी पुरवठा म्हणजेच *समान जलपुरवठा योजना* आहे. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, ती पूर्ण करण्यात येईल.”

Local ad 1