पुणे महापालिकेचे मेट्रोपोलिटन सर्व्हेलन्स युनिट कार्यान्वित | Public Health Pune
पुणे : पुणे महापालिकेतर्फे शहरात मेट्रोपोलिटन सर्व्हेलन्स युनिट कार्यान्वित करण्यात आले आहे. या युनिटसाठी मनुष्यबळाचे प्रशिक्षण 23 ते 25 सप्टेंबरदरम्यान घेण्यात आले. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांची समन्वय बैठक पार पडली. यावेळी सर्व्हेलन्स युनिटचे उद्दिष्ट व कामकाज याबाबत माहिती देण्यात आली. (pune metropolitan surveillance unit health)
आगामी काळात साथरोग उद्भवल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सर्व विभागांमध्ये योग्य समन्वय असावा, यासाठी चर्चाही झाली. या बैठकीस विविध महत्त्वाच्या संस्था आणि विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते, ज्यामध्ये : विमानतळ प्रशासन, भारतीय हवामान विभाग, सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, रेल्वे विभाग, राज्य अन्न व औषध प्रशासन, एनआयव्ही, जागतिक आरोग्य संघटना (WHO), राज्य किटकजन्य आजार नियंत्रण विभाग, पशु-संवर्धन विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभाग, वैद्यकीय महाविद्यालये, डॉक्टर्स असोसिएशन्स, तसेच महापालिकेचे आरोग्य, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, विद्युत व भवन रचना विभाग यांचा समावेश होता.
सर्व्हेलन्स युनिटचे महत्त्व
पुणे शहराने यापूर्वी स्वाईन फ्लू (2009), कोविड (2020) आणि जीबीएस (2025) सारखे आजार अनुभवले आहेत. पर्यावरण व हवामान बदल, दूषित अन्न-पाणी, तसेच पशु-पक्ष्यांच्या माध्यमातून उद्भवणारे आजार ओळखण्यासाठी हे युनिट महत्त्वाचे ठरणार आहे. यातून आजारांचे सर्वेक्षण, प्रयोगशाळा सक्षमीकरण, प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृती केली जाणार आहे.
आरोग्य व्यवस्थेसाठी महत्त्वाचे पाऊल
सर्व्हेलन्स युनिटच्या माध्यमातून :
* वेळेवर माहिती संकलन
* रोगांचे विश्लेषण
* त्यावर आधारित त्वरित उपाययोजनाया गोष्टी प्रभावीपणे राबविणे शक्य होणार आहे. नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी ही यंत्रणा एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. भवन रचना विभागाला हे युनिट सर्वोत्तम, सुसज्ज व अत्याधुनिक करण्यास प्राधान्याने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
“मेट्रोपोलिटन सर्व्हेलन्स युनिटमुळे पुण्यातील संसर्गजन्य आजारांचे वेळेत निदान, प्रतिबंध आणि नियंत्रण यामध्ये मोठी मदत होणार आहे. विविध क्षेत्रातील आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक व अधिकारी यांना तांत्रिक प्रशिक्षण मिळेल. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत सुधारणा घडून येईल.” – नवल किशोर राम,आयुक्त पुणे महापालिका.